बीड : दसरा मेळाव्यातील भाविकांच्या समूहाकडे वक्रदृष्टी करून पोलिसांनी पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हा चोख कर्तव्य बजावणाऱ्या बीड पोलिसांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या गर्दीकडे मात्र दुर्लक्ष करुन पक्षपातीपणा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पालकमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याकडे केली.
सण उत्सव घराच्या आत करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असा सल्ला जनतेला देणाऱ्या सरकारचे प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कायदा पायदळी तुडवत दीपावली फराळ व स्नेह मिलनाचा कार्यक्रम घेत गर्दी जमवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतराचे संकेत डावलून जमावबंदी कलमाचेही उल्लंघन करण्यात आले. मंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. कायद्यापुढे सर्व समान असताना पक्षपातीपणा का, असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. मात्र, गर्दी जमल्या प्रकरणी त्यांच्यासह इतरांवर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आता भाजपने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदार संघात केलेल्या दिवाळी स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाच्या गर्दीचा मुद्दा पुढे केला आहे. दसऱ्याच्या कार्यक्रमाबाबत चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना ही गर्दी दिसली नाही का, असा सवाल करत कायदा सर्वांसाठी समान असून प्रत्येक दोषींवर कारवाई करण्याचे कर्तव्य पोलिसांनी निभावावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रीतसर गुन्हा नोंद करावा, त्यांनी कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का, याची चौकशी करावी, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याकडे केली. २० व २१ नोव्हेंबरला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे दिपावली पाडव्याच्या निमित्ताने दिपावली फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी हजारो लोक एकत्रित जमा झाले होते. दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही. आयोजक राज्याचे मंत्री असताना सुध्दा त्यांनी वरील कायद्याचा भंग करून लोकांचा जमाव जमा केला होता. परंतु पोलीसांमार्फत त्यांचेवर कोणतीही कायदेशीर कारवाई अथवा गुन्हा नोंद केलेला नाही. कायद्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर व चिंतनीय बाब असल्याचे निवदेनात म्हटले आहे.
Edited By : Jagdish Pansare

