औरंगाबादचे संभाजीनगर करायचे, असे मुख्यमंत्री म्हणालेत काय? - whether CM asked for change of Name of Aurangabad questions ashok chavan | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादचे संभाजीनगर करायचे, असे मुख्यमंत्री म्हणालेत काय?

लक्ष्मण सोळुंके
शनिवार, 2 जानेवारी 2021

काॅंग्रेसचा नामांतराला विरोध कायम असल्याची अशोक चव्हाणांचीही भूमिका 

जालना : औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत आहे, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाकमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली. मुख्यमंत्री उद्धव हे जेव्हा याविषयी बोलतील आणि जेव्हा हा विषय सरकारकडे येईल तेव्हा बसून ठरवू, असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या महाविकास आघाडीत कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे.

काॅंग्रेसच्या भूमिकेचा पुनरूच्चार चव्हाण यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे आहे, असे अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. जेव्हा हा विषय सरकारकडे चर्चेला येईल तेव्हा बसून ठरवू असे. शहरांची नावे बद्दलण्यापेक्षा विकासकामांवर सरकारने लक्ष द्यावे.

औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे सांगत याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास व्यक्त करत आमच्यात मतभिन्नता असली तरी आमची खरी कुस्ती ही भाजप आणि एमआयएमशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

नामांतराच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी तीन दिवसांपूर्वी काॅंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत. नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख