पालकमंत्र्यांच्या फेरसर्व्हेचे विमान कुठे भरकटले... - Where did the Guardian Minister's re-survey plane go | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांच्या फेरसर्व्हेचे विमान कुठे भरकटले...

दत्ता देशमुख
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पहिल्या पंचनाम्यात आष्टी, पाटोदा, केज आणि पालकमंत्र्यांची परळी तालुक्यात अल्प नुकसान दाखविल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी फेरसर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते.
 

बीड : आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदारसंघात फक्त शिरुर कासार तालुक्याला सहा कोटी वगळता बाकी दोन तालुक्याला काहीच पैसे आलेले नाहीत. पालकमंत्री म्हणतात फेरसर्व्हे करणार. मग, पालकमंत्र्यांचे फेरसर्व्हेचे विमान नेमकं कुठं भरकटलं, ते अजून सापडत नाही,असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा येत्या दोन डिसेंबरला रास्तारोको आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीपावर आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, परतीच्या पावसाने या आशेवर पाणी फेरले. दरम्यान, मोठा गजहब झाल्यानंतर प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात अगदी पालकमंत्र्यांच्या परळीसह केज, आष्टी तालुक्यात काहीच नुकसान नसल्याचा अहवाल दिला होता. तरीही फेरपंचनाम्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

फेरपंचनाम्यात परळी, केजमध्ये नुकसान आढळले आणि अंबाजोगाईचे नुकसानीचे काही क्षेत्र वाढले. मात्र, फेरपंचनाम्यात आष्टी तालुक्यात अजिबात नुकसान नसल्याचा अहवाल दिला गेला. दरम्यान, नुकसान भरपाईपोटी शासनाने तीनशे सहा कोटी रुपये मंजूर करुन यातील १५३ कोटी रुपये वर्ग केले आहेत. दरम्यान, आष्टी मतदार संघातील आष्टीत शुन्य आणि  पाटोद्यात अल्प नुकसान दाखविल्याने सुरेश धस संतापले आहेत.

तीन - तीन वेळा कांद्याचे रोप आणावे लागले. कांदा, कापूस, सोयाबीन, तूर या सगळ्या पिकांचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माञ तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी, कृषीसहाय्यक यांनी कोणीही याचे सर्व्हे केलेले नाहीत. म्हणून सरसकट नुकसान भरपाई ३० नोव्हेंबर पर्यंत जाहीर केली नाही तर या प्रशासनाच्या विरोधात येणाऱ्या २ डिसेंबर रोजी आष्टी येथे प्रचंड मोर्चा तसेच रस्ता रोको करणार असल्याचेही सुरेश धस यांनी सांगितले. 

अलिकडे कोरोनाप्रमाणे जनावरांमध्ये लम्पी आजार वाढला आहे. या आजाराला उपचार नाही परंतु गोटफॉक्स हे व्हॅक्सिनेशन जनावरांना लागु होत आहे. बीड जिल्ह्यात या औषधाची एकही व्हॅक्सिन शिल्लक नाही, असेही धस म्हणाले. सरकार नेमकं झोपलय का ? हे सरकार कुठे आहे? जिल्ह्याची जिल्हा परिषद कुठे आहे? बीड जिल्ह्याचे प्रशासन कुठे आहे? असा सवाल सुरेश धस यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख