राज्यपालांनी केलेल्या कौतुकाचे गुपीत काय? अमित देशमुख म्हणाले, ते गुपीतच राहू द्या.. - What's the secret to the governor's appreciation? Amit Deshmukh said, keep it a secret | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांनी केलेल्या कौतुकाचे गुपीत काय? अमित देशमुख म्हणाले, ते गुपीतच राहू द्या..

राम काळगे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

सतीश चव्हाण यांचे काम अतिशय चांगले आहे. विधिमंडळामध्ये त्यांनी मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी आवाज उठवला असून या मतदारसंघातून पुन्हा त्यांना संधी दिली जाईल, असे संकेतही देशमुख यांनी दिले.  ते निश्चित यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निलंगा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे एका कार्यक्रमता तोंडभरून  केले होते. तसेच  तुम आगे बढो, असा सल्लाही दिला होता. यावर आपले व राज्यपालाचे काय गुपित आहे, असे विचारले असता राज्यपालांच्या काही गोष्टी गुप्त असतात, त्या कळू द्यायच्या नसतात म्हणत अमित देशमुख यांनी हा प्रश्न खुबीने टोलावला.

निलंगा येथे अमित देशमुख यांनी पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना संसर्ग आढावा व पूरग्रस्त निधीबाबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील विविध विषयांची माहिती दिली. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे.

त्यामुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांनाही तात्काळ मदत मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ग्रामीण भागात येण्याच्या शक्यते बद्दल परिस्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्रात संभाव्य सावधानता म्हणून काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल व सरकार यांच्यातील संघर्ष आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री असलेल्या अमित देशमुख यांचे जाहीर कार्यक्रमात केलेले कौतुक या विषयी पत्रकारांनी प्रश्न केला.  यावर स्मित हास्य करत राज्यपालांच्या काही गोष्टी गुप्त असतात त्या कळत नाहीत, अशी गुगली टाकली. 

सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. औरंगाबाद विभागातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत विचारले असता  सतीश चव्हाण यांचे काम अतिशय चांगले आहे. विधिमंडळामध्ये त्यांनी मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी आवाज उठवला असून या मतदारसंघातून पुन्हा त्यांना संधी दिली जाईल, असे संकेतही देशमुख यांनी दिले.  ते निश्चित यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख