रोज सरकार पाडण्याचे भाजपचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे.. - We have accepted the challenge of BJP to overthrow the government every day. | Politics Marathi News - Sarkarnama

रोज सरकार पाडण्याचे भाजपचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे..

जगदीश पानसरे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्रासह देशातील ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, ते पाडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक गोष्टी घडल्या, तेव्हा आता या रोज रोजच्या आव्हानाला आम्हीही सामोरे जाण्याचा आणि ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद ः ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तिथे तिथे ते पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे, रोज सरकार पाडण्याचे आव्हान केले जात आहेत, त्यामुळे आम्हीही ते स्वीकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणात देखील पुन्हा तेच सांगितले आहे, त्यामुळे भाजपने आमचे सरकार पाडूनच दाखवावे, आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले असल्याचा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

काॅंग्रेसच्या वतीने राज्य आणि देशभरात केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत जागृती मेळाव्यासाठी अशोक चव्हाण सध्या दोन दिवसांच्या औरंगाबाद आणि जालना दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी औरंगाबादेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी कालच्या दसऱ्या मेळाव्यात केलेल्या विधानाचा दाखला देत प्रश्न विचारला.

यावर उत्तर देतांना अशोक चव्हाण म्हणाले, उठसूठ सरकार पाडण्याचे आव्हान भाजपकडून दिले जात आहे,आणि ्म्हणून आम्ही देखील ते स्वीकारले आहे. भाजपचे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावेच. मुख्यमंत्र्यांनी देखील हे आव्हान स्वीकारले आहे. महाराष्ट्रासह देशातील ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, ते पाडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक गोष्टी घडल्या, तेव्हा आता या रोज रोजच्या आव्हानाला आम्हीही सामोरे जाण्याचा आणि ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दसरा मेळाव्या निमित्त काल मुंबईच्या सावरकर स्मारक सभागृहात मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले. या भाषणाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रातून २०० कोटी रुपये पाठवण्यात आले होते, असा दावा आपल्या भाषणात केला होता. तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आमचे सरकार पाडून दाखवाच असे आव्हान देतांना पण आधी तुमचे केंद्रातले सरकार सांभाळा असा टोला लगावला होता.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख