नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर यांची नियुक्ती  - Varsha Thakur as CEO of Nanded Zilla Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर यांची नियुक्ती 

प्रमोद चौधरी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

वर्षा ठाकूर यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड येथे काम केले आहे. दरम्यान, त्यांनी तक्रारदारांना थेट भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले होते. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी पुरवठा विभागाच्या उपायुक्त पदावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या त्या सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

नांदेड ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची निवड झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी  काढले.  तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची बदली १७ मार्च रोजी झाली होती, तेव्हापासून हे पद रिक्तच होते.

दरम्यान, प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई होवू नये, यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. काकडे यांच्या बदलीनंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनेक नावांची चर्चा होती, त्यामध्ये वर्षा ठाकूर आणि शिवानंद टाकसाळे यांची नावे आघाडीवर होती.  

वर्षा ठाकूर यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहे. या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर महिलाच आहे. तसेच उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार याही महिलाच आहे. त्यात आता सीईओ म्हणूनही महिलाच आल्याने जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने महिला राज प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे.

वर्षा ठाकूर यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड येथे काम केले आहे. दरम्यान, त्यांनी तक्रारदारांना थेट भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले होते. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी पुरवठा विभागाच्या उपायुक्त पदावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सध्या त्या सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काही काळ म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून काम बघितले आहे. त्यांचा हा दांडगा अनुभव निश्‍चितच नांदेड जिल्हा परिषदेला उपयोगी पडणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख