उद्धव ठाकरे, शरद पवारांमुळे वैद्यनाथला थकहमी; इतरांनी श्रेय घेऊ नये.. - Uddhav Thackeray, Sharad Pawar exhausted Vaidyanath; Others should not take credit | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे, शरद पवारांमुळे वैद्यनाथला थकहमी; इतरांनी श्रेय घेऊ नये..

दत्ता देशमुख
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून सरकारने वैद्यनाथ कारखान्याला १० कोटी ७७ लाख रूपयाची थकहमी दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला थकहमी द्यावी, यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच या हमी रकमेकच्या माध्यमातून कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा थकीत पगार द्यावा, यंदा शंभर टक्के गाळप करावे. भविष्यातही कारखान्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत करु, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. 

यावर पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेत थकहमीसाठी आपण कसा पाठपुरावा केला हे सांगतानाच इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत टोला लगावाला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता.

या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला १० कोटी ७७ लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण या सर्वांचे त्यांचे आभार मानत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यावरून या बहीण- भावंडात नेहमीच जुंपत आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, एफआरपीचा मुद्दा चांगलाच तापला होता. एकंदरित धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथला थकहमी मिळवून दिल्याचे श्रेय घेताच पंकजा यांनी तातडीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख