अमेरिकेत ट्रम्प हरले, पण बिहारमध्ये मोदी जिंकले; देशात आता भाजपचीच हवा.. - Trump lost in America, but Modi won in Bihar; The country needs BJP now | Politics Marathi News - Sarkarnama

अमेरिकेत ट्रम्प हरले, पण बिहारमध्ये मोदी जिंकले; देशात आता भाजपचीच हवा..

जगदीश पानसरे
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मी चुकीचं काय बोललो? यांच्याकडे शेतकरी गेला, कामगार गेला, व्यावसायिक गेला तर त्यांचे एकच उत्तर तुमची जबाबदारी. मग आम्हीही म्हणतो केंदाकडे पैसे कशाला मागता, तुमचे सरकार तुमची जबाबदारी, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला. तुमचं सरकार कुणाच्या इशाऱ्यावर चालते आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून फाईलींवर सह्या करता हे देखील आम्हाला माहित आहे, अशा शब्दांत दानवे यांनी ठाकरेंवर टिका केली.

औरंगाबाद ः  आपली हवा आहे हे कसं ओळखावं, तर ज्या पक्षाकडे सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांचा ओढा आहे, जिथे उमेदवारी मागण्यासाठी मोठी स्पर्धा होते, तो पक्ष आणि त्याची हवा आहे असे समजावे. अहो अमेरिकत ट्रम्प हरले, पण बिहारच्या निवडणुकीत मोदी जिंकले. त्यामुळे देशात भाजपचीच हवा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या.. गावागावांत आता भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मग आपली हवा असतांना पदवीधरचा उमेदवार कसा पडू शकेल? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केला. आता आम्ही तुमच्यामध्ये हवा भरली आहे, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आता गाडी पंक्चर होऊ देऊ नका, असा चिमटाही दानवे यांनी यावेळी काढला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत भाषण करत फटकेबाजी केली. राज्य सरकारवर टिका करतांनाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱा मेळाव्यात आपल्या नावाचा केलेला उल्लेख यावरही भाष्य केले. रावसाहेब दानवे म्हणाले, पदवीधर मतदार हा बुद्धीजीवी असतो आणि गेल्या कित्येक निवडणुकीपासून तो आपल्याकडे आहे. सायलेंट वोटर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यामुळे इथून गेल्यानंतर जिल्हा, तालुकास्तरावर बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहचा. पदवीधर मतदारांवर गेल्या कित्येक वर्षांपासून आपली असलेली पकड ढिली होता कामा नये, यासाठी झपाटून कामाला लागा.निवडणुकीआघी आपल्यामध्ये कोणी पंक्चर तर नाही ना?  हे तपासून पहा आणि आता तुमच्यात भरलेली हवा मतदान पार पडेपर्यंत संपू देऊ नका. आपण एकटे आणि दुसरीकडे तीन पक्ष आहे, पण बिहार निवडणुकीतील विजयानंतर देशात आपली हवा आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे  मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे आलाच पाहिजे, असे आवाहनही दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.

तुमचं सरकार, तुमची जबाबदारी...

केंद्राकडे थकित असलेल्या जीएसटीच्या पैैशावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केद्रातील सरकारवर टिका केली होती. त्याला उत्तर म्हणून संसार तुमचा मग बापाकडे पैसे कशाला मागता, असा टोला दानवे यांनी एका सभेत लगावला होता. यावर आमचा बाप महाराष्ट्रात आहे, रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात केला होता. रावसाहेब दानवे यांनी पुन्हा या विधानाचा उल्लेख करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दानेव म्हणाले, मी चूकन बोललो तर माझे नाव दसरा मेळाव्यात निघाले. 

पण मी चुकीचं काय बोललो? यांच्याकडे शेतकरी गेला, कामगार गेला, व्यावसायिक गेला तर त्यांचे एकच उत्तर तुमची जबाबदारी. मग आम्हीही म्हणतो केंदाकडे पैसे कशाला मागता, तुमचे सरकार तुमची जबाबदारी, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला. तुमचं सरकार कुणाच्या इशाऱ्यावर चालते आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून फाईलींवर सह्या करता हे देखील आम्हाला माहित आहे, अशा शब्दांत दानवे यांनी ठाकरेंवर टिका केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख