चोवीस वर्षात अशी वेळ आली नव्हती, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कारखाने अडचणीत.. - There was no such time in twenty four years, factories were in trouble due to wrong policies of the Center | Politics Marathi News - Sarkarnama

चोवीस वर्षात अशी वेळ आली नव्हती, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कारखाने अडचणीत..

लक्ष्मीकांत मुळे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आज मला सांगायला आनंद वाटतो की वर्षभरात मी ३३ कोटी रुपयांची देणी दिली, आज कुणाचा एकही रूपया आपण ठेवलेला नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते. केंद्र सरकारकडे वारंवार मागणी आणि पाठपुरावा केल्यानंतर आता कुठे ऊसा प्रमाणे साखरीचे भाव निश्चित करण्यात आले आहे. ऊसाचा एफआरपी दर २६०० रुपये तर साखरेची एमएसपी ३१०० रूपये ठरवण्यात आली आहे.

अर्धापूर ः केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारी, सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. काही ठिकाणी तर कारखाने विकावे लागत आहे. २४ वर्षात अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. आम्ही ओरडून केंद्राला सांगत होतो, जसा आपण ऊसाला एफआरपी देतो, तशी साखरेची देखील किंमत निश्चित करा, पण ते ऐकत नव्हते. आता कुठे त्यांना आमचे म्हणणे पटले आणि त्यांनी एफआरपी आणि साखरेची एमएसपी ठरवण्याचा निर्णय घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

देगाव येळेगाव (ता. अर्धापूर) येथील भाऊराव सहकारी साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ चव्हाण आणि सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. यावेळी भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याची वाटचाल, आलेली संकट, त्यातून मार्ग काढत कारखाना भक्कमपणे कसा सुरू आहे, हे सांगतानाच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा साखर कारखानदारीला कसा फटका बसला हे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

चव्हाण म्हणाले, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यावर जसे प्रेम केले तसेच प्रेम आणि जिव्हाळा तुम्ही मला व माझ्या कुटुंबाला दिला, याची मला जाणीव आहे. त्यामुळे या जाणीवेतूनच मी काम करतो आहे. चोवीस वर्षात ओढावली नाही अशी परिस्थिती आज साखर कारखाना चालवतांना आपल्याव्र ओढावली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक सभासदांना देण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते. दोन हजारावर भाव मी जाहीर केला होता, पण पैसे नव्हते. तेव्हाच पुढच्या वर्षी मी शेतकऱ्यांचा एकही रुपया ठेवणार नाही, अशा शब्द तुम्हाला दिला होता.

आज मला सांगायला आनंद वाटतो की वर्षभरात मी ३३ कोटी रुपयांची देणी दिली, आज कुणाचा एकही रूपया आपण ठेवलेला नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते. केंद्र सरकारकडे वारंवार मागणी आणि पाठपुरावा केल्यानंतर आता कुठे ऊसा प्रमाणे साखरीचे भाव निश्चित करण्यात आले आहे. ऊसाचा एफआरपी दर २६०० रुपये तर साखरेची एमएसपी ३१०० रूपये ठरवण्यात आली आहे. सहाशे रुपये यातून मिळत असले तरी ते पुरसे नाहीत. कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार, देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्च प्रचंड आहे.

पण मी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या वेळी तुम्हाला शब्द दिला होता, आणि तो मी पाळला याचा आनंद आहे. ३३ कोटी रुपयांची देणी आपण दिली असून आता कुणाचे पैसे देणे शिल्लक नाही, याचा पुनरूच्चार देखील अशोक चव्हाण यांनी केला. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी राज्य शासानाने दहा हजार कोटीचे पॅकेज घोषित केले आहे. त्यापैकी अडीच हजार कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार आहेत. त्यात मराठवाड्याला साडेपाचशे कोटी मिळणार असून या निधीतून तुटलेले रस्ते, पुल तयार करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख