शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू, पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही... - Take out loans for farmers, but don't leave them in the lurch | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू, पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही...

राम काळगे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

सध्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केला आहे. केंद्राचे पथक पाहणी करून गेल्यानंतरच राज्य सरकार त्यांच्याकडे नुकसानीचा प्रस्ताव पाठवणार आहे. तरीही राज्य सरकारचे कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रसंगी कर्ज काढू ,पण  शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

निलंगा : यंदाचे वर्ष विविध मार्गाने संकटाचे वर्ष ठरले आहे. कोरोना संसर्गामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारचे मंत्री, आमदार अतिवृष्टीग्रस्त भागाचे दौरे करीत आहेत. तेंव्हा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे सुध्दा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रात आपले वजन वापरून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना काढला. 

विजय वडेट्टीवार निलंगा तालुक्यातील सोनखेड, लिंबाळा, मदनसुरी, निटूर आदी गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी दौरा आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वडेट्टीवार म्हणाले, कोरोना संसर्गामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. कोकणामध्ये राज्यसरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना यापूर्वी मदत केली असून केंद्राने फुटकी कवडीही दिली नाही.

लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी ४० महसूल मंडळात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. एकाच रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केला आहे. केंद्राचे पथक पाहणी करून गेल्यानंतरच राज्य सरकार त्यांच्याकडे नुकसानीचा प्रस्ताव पाठवणार आहे. तरीही राज्य सरकारचे कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रसंगी कर्ज काढू ,पण  शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सध्या मंत्री, आमदार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करीत असून राज्याचे विरोधी पक्षनेतेही अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकारण करण्यापेक्षा विरोधी पक्ष नेत्यांनी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी आपली ताकद वापरून पाठपुरावा करावा व केंद्राकडून भरीव मदतीसाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून किती नुकसान झाले याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्रीही मराठवाड्याच्या दौर्‍यावर येणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत  शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, काँग्रेसचे अभय सोळुंके उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख