ऊसतोड संपाची जबाबदारी सुरेश धसांवर ; त्यांनीही महाराष्ट्र पिंजून काढला

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच सुरेश धस यांच्यावर ऊसतोड कामगार संपाच्या निमित्ताने भाजपने दिलेल्या जबादारीतून सिद्ध करण्याची संधी आमदार सुरेश धसांना भेटली आहे.
Mla suresh dhas news Beed
Mla suresh dhas news Beed

बीड : नेतृत्व, वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळेच जिल्हा परिषद सदस्य ते तीन वेळा आमदार आणि राज्यात मंत्री राहीलेल्या सुरेश धस यांच्यावर भाजपने नव्या इनिंगमध्ये ऊसतोड कामगारांच्या संपाच्या निमित्ताने मोठी जबादारी टाकली. धसांनाही भाजपमध्ये पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी या निमित्ताने मिळाली असून जबादारीच्या निमित्ताने ते आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

तशी सुरेश धसांच्या राजकारणाची खरी सुरुवात भाजपमधूनच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर याच पक्षातून ते प्रथम विधीमंडळातही पोचले. नंतर, दोन वेळा राष्ट्रवादीकडून त्यांनी विजय मिळविला. राजकिय डावपेचांत माहिर असल्याचे त्यांनी एकदा भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात देऊन, दुसऱ्यांदा ऐनवेळी स्वत:च्या समर्थकाला अध्यक्ष करुन, तर  मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या हाताशी आलेली सत्ता भाजपच्या गळ्यात घालून दाखवून दिलेलेच आहे.

वक्तृत्वातही तरबेज असलेले सुरेश धस व्यासपीठावर आणि विधीमंडळातील भाषणांतही तेवढेच आक्रमक, विनोदी असतात. मतदार संघातील तीनही तालुक्यांतील विविध संस्थांवर वर्चस्व आणि जिल्हास्तरावरील संस्थांत त्यांच्या साथीशिवाय अंतिम निर्णय होत नाहीत, यातून त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक जिल्ह्याला अनेकदा दिसली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ऐनवेळी लातूर - उस्मानाबाद - बीड मतदार संघाची उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी - काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या मतदार संघातून विजय मिळवून त्यांनी आताच्या भाजपलाही आपल्या ताकदीचा परिचय करून दिला होता.

मात्र, नव्या इनिंगमध्ये भाजपने ऊसतोड कामगारांच्या संपाच्या निमित्ताने त्यांच्यावर प्रथमच राज्यस्तरावरील जबाबदारी टाकली. अगदी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या सुचनेवरुन त्यांचे नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बीड व अहमदनगर अशा १४ जिल्ह्यांत रितसर दौरा निश्चित केल्याचे पत्र भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने संबंधीत जिल्ह्याच्या भाजप जिल्हाध्यक्ष आमदार, खासदारांना पाठविण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुर्वीच्या काळात अनेक नेत्यांनी आंदोलने केली. भाजपमध्ये याची पुर्ण धुरा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व नंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर आली. ऊसतोड कामगारांसाठी दिवंगत मुंडेंचा शब्द अंतिम असे. स्वत: कारखानदार झाल्यानंतरही त्यांनी कामगारांच्या प्रश्नांनाच अधिक वाचा फोडली. त्यानंतर पुढे पंकजा मुंडे यांनीही हा लढा जोमाने लढविला. यंदाही लॉकडाऊनच्या सुरुवातीला ऊसतोड मजूर परतण्याच्या वेळी निर्माण झालेल्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी पंकजा मुंडे यांनी सरकारसोबत यशस्वी समन्वय साधला.

ऊसतोड कामारांसाठी अंगावर गुन्हे..

पण, याच काळात मजूरांच्या प्रश्नासाठी थेट घटनास्थळ गाठून मदत करण्यासाठी सुरेश धस धावले. त्यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर तीन गुन्हेही नोंद झाले. सुरुवातीला संप सुरु झाल्यानंतर मतदार संघातील आष्टी, पाटोदा व शिरुर कासार येथे कामगार व मुकादमांचे मेळावे घेऊन सुरेध धस यांनी कारखानदार आणि सरकारवर जोदार टिकास्त्र सोडले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार कसे ऊसतोड मजूरांचे शोषण करताहेत याचा लेखाजोखाच आकडेवारीसह मांडला.

विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा चांगलाच तापविला. त्यामुळे खुश झालेल्या भाजपने सुरेश धस यांच्यावर राज्याचीच जबाबदारी सोपविली. मग, धसांनीही पायाला भिंगरी लावून वरिल जिल्ह्यांतील विविध तालुक्यांत ऊसतोड कामगार व मुकादमांच्या बैठका व मेळावे घेतले.

ऊसतोड कामगारांच्या मजूरीत दिडशे टक्के वाढ आणि मुकामदमांच्या कमीशनमध्ये वाढ झाल्याशिवाय कारखाने सुरुच होणार नाहीत, असा शंख आता धस फुंकत आहेत. या निमित्ताने भाजपमधील नव्या इनिंगमध्ये खांद्यावर पडलेल्या राज्यस्तरीय जबाबदारीतून धसांनी पुन्हा एकदा स्वत:तील संघटन, नेतृत्वाला सिद्ध केले आहे. भविष्यात याची बक्षीसी म्हणून भाजप त्यांना काय देणार हे पहावे लागणार आहे.

Editd By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com