शरद पवारांच्या पाठिंब्याने आम्हाला शंभर हत्तींचे बळ.. - With the support of Sharad Pawar, we have the strength of a hundred elephants | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या पाठिंब्याने आम्हाला शंभर हत्तींचे बळ..

जगदीश पानसरे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

शरद पवारांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे समजताच खासदार राजीव सातव यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले. शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला शंभर हत्तींचे बळ मिळाल्याचे सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

औरंगाबाद ः ‘ आदरणीय शरद पवार साहेबांनी आमच्या निलंबनाबद्दल आज जाहीर नापसंती व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर आमच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देत स्वतःही एक दिवसाचे उपोषण ते करत आहेत. आमच्यासाठी ही शंभर हत्तीचे बळ मिळणारी गोष्ट आहे, साहेब आपले मनापासून आभार', अशा शब्दांत कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आभार मानले आहेत. पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करून अन्नत्याग करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त केले.

कृषी सुधारणा विधेयकावरून देशभरात सध्या गदारोळाचे वातावरण सुरू आहे. विशेषतः पंजाब, हरयाणा सारख्या राज्यांमध्ये या विधेयकाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजुर करून घेतले, परंतु यावेळी सभागृहात मोठे नाट्य घडले.

कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये जात उपसभापतींसमोर गोंधळ घातला. या प्रकरणी खासदार राजीव सातव यांच्यासह अन्य आठ खासदारांवर सात दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आणि निलंबित खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्या जवळच उपोषण सुरू केले.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. एवढेच नाही तर ज्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली ती चुकीची असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपणही एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगितले.

शरद पवारांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे समजताच खासदार राजीव सातव यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले. शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला शंभर हत्तींचे बळ मिळाल्याचे सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात राज्यसभेमध्ये कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. सभागृहात विरोध प्रदर्शन करतांना ते आघाडीवर असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्यावर निलंबनाची कारववाई करण्यात आली.

मराठवाड्यातील हिंगोली सारख्या शहरातून लोकसभेवर निवडूण गेल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातव यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात चमकदार कामगिरी करत त्यांनी आपले नेते राहुल गांधी यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांचे विश्वासू आणि जवळचे म्हणून सातव ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख