शेतात आडवा झालेला ऊस कारखान्यांनी तात्काळ तोडून न्यावा... - Sugarcane mills that are lying in the field should be cut down immediately ... | Politics Marathi News - Sarkarnama

शेतात आडवा झालेला ऊस कारखान्यांनी तात्काळ तोडून न्यावा...

बाबासाहेब गोंटे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

शेतात जमिनीवर आडवा पडलेला ऊस तात्काळ तोडून साखर कारखान्यात नेण्यात येईल. शेतकऱ्यांनी आलेल्या संकटाचा सामना नेटाने करावा, खचून जाऊ नये, असे आवाहनही टोपे यांनी केले.

अंबड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, उभा ऊस आडवा झाला, अन्य पिकांच्या गंजी वाहून गेल्या. एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे साथरोगाचा धोका अशा दुहेरी संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. पण शेतकऱ्यांनी खचून न जाता या संकटाचा सामना करावा, सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पाहणी दौऱ्यात  शेतकऱ्यांना दिली.

सततचा पाऊस,वादळ वारे,नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी,ढगफुटीसारख्या पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचले आहे. कपाशी,तूर,मका,सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटाबरोबरच रोगराई पसरल्याने फळबागाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा ऊस अक्षरशः जमिनीवर आडवा झाला. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी राज्याचे आरोग्य व सार्वजनिक कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी केली.

अंबड तालुक्यातील बेलगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन टोपे यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या शेतकऱ्यांचा ऊस जमिनीवर आडवा पडला आहे, त्यांच्या ऊस तोडीचे आदेश साखर कारखान्यांना देऊन नुकसान टाळले जाईल,सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील टोपे यांनी यावेळी दिली.

टोपे  म्हणाले, गाय, बैल, म्हैस या पशुधनाला लम्पि नावाचा आजार झाला आहे. यामुळे शेतकरी,पशुपालक यांना दिलासा मिळावा यासाठी पशुचिकित्सकांनी जनजागृती करावी. यासाठी लागणारी लस उपलब्ध करून दिली जाईल.यासाठी पशुधनाची योग्य वेळी तपासणी करावी. शेतात जमिनीवर आडवा पडलेला ऊस तात्काळ तोडून साखर कारखान्यात नेण्यात येईल. शेतकऱ्यांनी आलेल्या संकटाचा सामना नेटाने करावा, खचून जाऊ नये, असे आवाहनही टोपे यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात दाखल झाले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे सरकारमधील मराठवाड्यातील दोन मंत्री राजेश टोपे आणि धनंजय मुंडे हे देखील आपापल्या मतदारसंघातील नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देत होते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख