फडणवीस टोलवाटोलवीत तरबेज, मुख्यमंत्री असतांना पाच वर्ष हेच शिकले.. - State minister abdul sattar criticise devendra fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस टोलवाटोलवीत तरबेज, मुख्यमंत्री असतांना पाच वर्ष हेच शिकले..

सयाजी शेळके
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पाच ते सहा दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण असले तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. प्रशासनालाही तशा सुचना दिल्या आहेत.

उस्मानाबाद ः शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार नसली तरी एकही नुकसानग्रस्त शेतकरी मंदतीपासून वंचित राहणार नाही, याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येत्या पाच ते सहा दिवसात पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच शासनाकडून मदत दिली जाईल, असा विश्वास राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते फडणवीस हे टोलवाटोलवीत तरबेज आहेत, मुख्यमंत्री असतांना पाच वर्ष ते हेच शिकले, असा टोलाही सत्तार यांनी यावेळी लगावला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २०) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार कैलास घाटगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी यावेळी उपस्थितहोते. यावेळी सत्तार म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजार ३६१ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये एक लाख ३६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

प्रशासनाला पंचनामे करण्यासाठी अडथळे येत आहेत. तसेच अधूनमधून पाऊसही मोठ्या प्रमाणात हजेरी लावित आहे. तरीही पाच ते सहा दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण असले तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. प्रशासनालाही तशा सुचना दिल्या आहेत. असेही सत्तार यांनी सांगितले.

कोरोनाचा मदतीला अडथळा

कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही राज्य सरकार मदत देणारच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दौऱ्यावर येत आहेत. त्यातच केंद्र शासन जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा पैसा राज्याला देत नाही. अद्यापही २६ हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी आहे. हा राज्याच्या हक्काचा पैसा आहे. अशाच कारणामुळे भरघोस मदत देता येणार नाही. पण, पंचनाम्याचे काम पूर्ण होताच मदतीला सुरूवात होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षे टोलवाटोलवी कशी करावी, हेच शिकले आहेत, यात ते तरबेज असल्याची टिकाही सत्तार यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख