फौजिया खान, इम्तियाज जलील यांच्यावर सरकारने सोपवली नवीन जबाबदारी - state government appoint fauzia khan and imtiaz jaleel on wakf corporation | Politics Marathi News - Sarkarnama

फौजिया खान, इम्तियाज जलील यांच्यावर सरकारने सोपवली नवीन जबाबदारी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान आणि एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सरकारने नवीन जबाबदारी टाकली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान आणि एआयएमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील या मराठवाड्यातील दोन नेत्यांवर राज्य सरकारने नवीन जबाबदारी टाकली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान आणि लोकसभा सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांना औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.  

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले असले तरी राज्यातील विविध महत्वाच्या महामंडळांवरील नियुक्त्यांना अद्याप मूहूर्त लागलेला नाही. महामंडळास इतर समित्यांवर कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याची चर्चा सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांत झालेली होती. परंतु कोरोना संकटामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, अद्यापही या नियुक्तांना वेग आलेला नाही. 

दरम्यान, शिवसेनेने काही दिवसांपूर्वी महामंडळावरील नियुक्त्यांसाठी आमदार, जिल्हाप्रमुख व पालकमंत्र्यांकडून याद्या मागवण्यास सुरूवात केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ, कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच विविध देस्थान मंडळांवरील नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जातात. पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांची अशा महामंडळ, समित्यांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडल्या, सगळ काही सुरळीत होऊ पाहत असतांनाच जागतिक कोरोना महामारीने देश व राज्याचे अर्थचक्रच ठप्प झाले. त्यामुळे महामंडळावरील नियुक्त्या लांबल्या आणि आशेवर बसलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख