काही नेते जिल्ह्यात पराभवाची वर्षपुर्ती साजरी करायला येतात... - Some leaders come to the district to celebrate the anniversary of the defeat | Politics Marathi News - Sarkarnama

काही नेते जिल्ह्यात पराभवाची वर्षपुर्ती साजरी करायला येतात...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोरोना सारखे जागतिक संकट आल्यानंतर लोकांना दिलासा, मदत देण्याची गरज होती. पण जिल्ह्यातील काही नेते कोरोना होईल या भितीने घरात बसून होते. आम्ही मात्र घाबरलो नाही, घराच्या बाहेर पडलो, लोकांना, ऊस मजुरांना मदत केली. राजकारण, हार-जीत होतच असते, पण जनसेवेचा घेतलेला वसा टाकता येत नाही.

अंबाजोगाई ः  हार-जीत सुरू असते, मी देखील २०१४ मध्ये निवडणुकीत पडलो होतो, पण म्हणून घरात बसलो नाही. आपली बांधिलकी जनतेशी असते त्यामुळे त्यांच्या सेवेत कायम राहिलं पाहिजे. पण जिल्ह्यातील काही नेते पराभवाची वर्षपुर्ती साजरी करायलाच येतात,  असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला. कोरोनाचे जागतिक संकट आले तेव्हा मी घरात बसून राहिलो नाही, रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली म्हणून मला लवकर कोरोना झाला, असा चिमटाही धनंजय मुंडे यांनी यावेळी काढला.

अंबाजोगाई तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी धनंजय मुंडे आले होते. मांजरा धरणातील जलपूजन केल्यानंतर मुंडे येडेश्वरी कारखान्याच्या गळीत हंगामाला उपस्थित शेतकरी व ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करत होते. सावरगांव येथील भक्तीशक्ती गडावर पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणानंतर धनंजय मुंडे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. ऊस मजुरांचे आंदोलन यासह अनेक मुद्यांवरून धनंजय मुंडे यानी पंकजा यांच्यावर निशाणा साधला.

कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यात न आलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टिका करतांना धनंजय मुंडे म्हणाले, कोरोना सारखे जागतिक संकट आल्यानंतर लोकांना दिलासा, मदत देण्याची गरज होती. पण जिल्ह्यातील काही नेते कोरोना होईल या भितीने घरात बसून होते. आम्ही मात्र घाबरलो नाही, घराच्या बाहेर पडलो, लोकांना, ऊस मजुरांना मदत केली. राजकारण, हार-जीत होतच असते, पण जनसेवेचा घेतलेला वसा टाकता येत नाही. आम्हाला याची जाणीव होती, निवडणुकीत माझाही पराभव झाला, पण मी घरात बसून राहिलो नाही.

कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील ऊस मजूर पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागातील कारखान्यावर अडकून पडले होते. मुख्यमंत्र्यांशी बोलून या मजुरांना आपापल्या घरी आणण्याचं काम केलं. नुसतं घरी आणून भागणार नव्हतं, त्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न होता, म्हणून जिल्हा परिषदेच्या मार्फत गोर-गरीबांना एक महिना पुरेल एवढ अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तु पुरवण्याची योजना राबवली.

ऊस मजुरांचे नुकसान होऊ देणार नाही..

ऊसतोड मजुरांच्या संघटनांचा सध्या संप सुरू आहे. कुणी दीडशे, सत्तर, चाळीस आणि एकवीस टक्के वाढ मागत आहे. जे स्वतःला ऊसतोड मजुरांचे नेते म्हणवून घेतात, ते एकवीस टक्के वाढ कशी मागतात? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. ऊस मजुरांच्या प्रश्नावरून राजकारण सुरू आहे, ज्याला राजकारण करायचे त्यांनी ते करावे, नेतृ्त्व कुणाला करायचे, याच्याशीही मला घेणे देणे नाही, पण माझ्या गरीब ऊसतोड मजुराला योग्य न्या मिळाला पाहिजे, ही भावना आहे, त्यासाठी मी काम करतोय. शरद पवार साहेबांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्या्मुळे यावर लवकरच तोडगा निघेल आणि ऊसतोड मजुरांचा प्रश्न समाधानकारक पद्धतीने निकाली निघेल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

येडेश्वरी येथील साखर कारखाना उभारून सात वर्ष झाली, त्यासाठी घेतलेले कर्जही फिटले, पण आमच्या कारखान्यावर अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा टोला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यावरून लगावला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख