भाजपचे काही नेते पक्षाला वेठीस धरत आहेत, मेटेंचा पकंजा मुंडेवर निशाणा.. - Some BJP leaders are holding the party hostage, Says Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे काही नेते पक्षाला वेठीस धरत आहेत, मेटेंचा पकंजा मुंडेवर निशाणा..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भाजपमधील काही लोक आपल्याच पक्षाची अडवणूक करून वेठीस धरतात. स्वत:ला पाहिजे तसेच निर्णय झाले पाहिजेत असा आग्रह धरतात, आणि त्यास महाराष्ट्र भाजप बळी पडत आहे. पक्षाची अडवणूक करणाऱ्यांनाच मराठवाडा पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून यावा असे वाटत नसावे, म्हणूनच ते लोक भाजपच्या जवळची मंडळी दूर जातील असे निर्णय घेत आहेत.

बीड : पदवीधर निवडणुकीत घटक पक्षाला केवळ गृहीत धरण्याचे काम भाजपने केले आहे. घटक पक्षाला बाजूला सारणे, त्यांना सोबत न घेणे ही भाजपची रणनिती आहे का, असा सवाल शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. मराठवाडा पदवीधर निवडणुकीसंदर्भात मंगळवारी शिवसंग्रामच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मेटे यांनी बोलावली होती. यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला डावलण्यात आल्याचा आरोप स्वतः मेटे यांनी केला आहे. हा आरोप करत असतांनाच काही भाजपचे नेते पक्षाची अडवणूक करून त्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपही मेटे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केला.

मेटे म्हणाले,  भाजपमधील काही लोक आपल्याच पक्षाची अडवणूक करून वेठीस धरतात. स्वत:ला पाहिजे तसेच निर्णय झाले पाहिजेत असा आग्रह धरतात, आणि त्यास महाराष्ट्र भाजप बळी पडत आहे. पक्षाची अडवणूक करणाऱ्यांनाच मराठवाडा पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून यावा असे वाटत नसावे, म्हणूनच ते लोक भाजपच्या जवळची मंडळी दूर जातील असे निर्णय घेत आहेत किंवा घेण्यास भाग पाडत आहेत, असा आरोपही विनायक मेटे यांनी केला. 

अशा लोकांच्या किती नादी लागायचे याचा भाजपच्या महाराष्ट्र नेतृत्वाने विचार करावा. काही लोकांचा स्वभाव ‘सूंभ जळाले तरी पीळ जात नाही’ असा असतो. महाराष्ट्रात तरी भाजप मित्रांना, घटक पक्षांना सोबत घ्यायचे कि नाही याचा विचार करावा किंवा त्यांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट  करावी, असेही मेटे म्हणाले.

सध्याची परिस्थिती भाजप राज्य नेतृत्वाच्या कानी घालणार असून २५ नोव्हेंबर पर्यंत योग्य निर्णय घेऊन कळवावे.असे प्रकार वारंवार होता कामा नयेत याचीही आपण खबरदारी घ्यावी, असे आपण भाजपच्या वरिष्ठ नेेत्यांना सांगणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख