मला जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी; शिवसेना खासदाराचा आरोप.. - Shivsena Mp Sanjay jadhav got threat of killing | Politics Marathi News - Sarkarnama

मला जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी; शिवसेना खासदाराचा आरोप..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने फोन करून आपल्याला ही धमकी दिल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यासाठी परभणीतूनच नांदेडच्या रिंद्धा नावाच्या मोठ्या टोळीला सुपारी देण्यात आल्याचेही जाधव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

परभणी : शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना अज्ञात इसमांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्वतः जाधव यांनीच मंगळवारी रात्री नानल पेठ पोलीस ठाण्यात जाऊन आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी २ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप देखील आपल्या तक्रारीत केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने फोन करून आपल्याला ही धमकी दिल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यासाठी परभणीतूनच नांदेडच्या रिंद्धा नावाच्या मोठ्या टोळीला सुपारी देण्यात आल्याचेही जाधव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार पोलिसांत करताच ही बातमी जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरली असून राजकीय वर्तुळात देखील यामुळे खळबळ उडाली आहे. खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आहे.

यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नांदेड येथील रिंदा गॅंग ही पंजाबवरून सुत्रे हालवत असल्याचे बोलले जाते. गुन्हेगारीसाठी प्रसिध्द असलेल्या या गॅंगला जाधव यांना मारण्याासाठी सुपारी देण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरा खासदार संजय जाधव यांनी नानलपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक जयकुमार मीना यांनी या प्रकरणी चौकशी पथक नेमले असून या तक्रारीची पूर्ण माहिती घेऊन शहानिशा झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख