राणा पाटलांच्या विरोधकांना जवळ करत शरद पवारांचा माइंड गेम.. - Sharad Pawar's mind game by bringing Rana Patil's opponents closer | Politics Marathi News - Sarkarnama

राणा पाटलांच्या विरोधकांना जवळ करत शरद पवारांचा माइंड गेम..

सयाजी शेळके
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आमदार पाटील यांचे भाजपात जाणे पवारांना रुचले नव्हते. विधानसभा निवडणुकीत `इतके वर्षे काय केले` असे म्हणत बोचरी टीकाही त्यांनी केली होती. रविवारी पुन्हा एकदा पवार यांनी राजकीय खेळीतून भाजप आमदार पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या रोष व्यक्त केला. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघांमधून आडवा विस्तव जात नाही. अन त्याच खासदार राजेनिंबाळकरांना पवारांनी तुळजापूरमध्ये दाखल होताच बोलावून घेतले, स्वतःच्या गाडीत बसविले. 

उस्मानाबाद ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. १८) जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासोबत राजकीय धुरुळाही उडविला. राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघात जावूनच पाहणी दौऱ्याला सुरूवात केली. शिवाय मुक्कामही तुळजापूरमध्येच. विशेष म्हणजे आमदार पाटील यांचे कट्टर वैरी, प्रतिस्पर्धी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना दौऱ्यात सोबत घेऊन लातूरकर मंत्र्यांसोबतही (अमित देशमुख) चर्चा करीत राजकीय धुरुळा उडवून दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ. पाटील वार्धक्याने राजकारणातून बाहेर आहेत. साहजिकच त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे गेला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत, भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.  

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा-केव्हा पवार जिल्ह्यात येत. तेव्हा त्यांचा कायम मुक्काम पाटील यांच्याकडे असायचा. शिवाय दौऱ्याचे नियोजन, सारथ्यही पाटील यांच्याकडून केले जात होते. त्यातच नातेवाईक असल्याने कौटुंबिक संबंध अधिकच दृढ होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीपासून हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. त्याचा प्रत्यय रविवारी खासदार पवार यांच्या दौऱ्यात आला.

आमदार पाटील यांचे भाजपात जाणे पवारांना रुचले नव्हते. विधानसभा निवडणुकीत `इतके वर्षे काय केले` असे म्हणत बोचरी टीकाही त्यांनी केली होती. रविवारी पुन्हा एकदा पवार यांनी राजकीय खेळीतून भाजप आमदार पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या रोष व्यक्त केला. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघांमधून आडवा विस्तव जात नाही. अन त्याच खासदार राजेनिंबाळकरांना पवारांनी तुळजापूरमध्ये दाखल होताच बोलावून घेतले, स्वतःच्या गाडीत बसविले. अन संपूर्ण दौऱ्यात सोबत घेत बळ देण्याचा प्रयत्न केला.

गाडीतील त्या सीटवर आता निंबाळकर..

भाजप आमदार पाटील यांचा मतदारसंघही तुळजापूरच आहे. त्याच मतदारसंघातील गावातून अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी सुरू केली. ज्या गाडीमध्ये कामय आमदार पाटील यांची जागा असायची, त्याच जागेवर खासदार राजेनिंबाळकर बसल्याने अनेकांना याचे कौतुक आणि कुतूहल देखील वाटले. रविवारी पवार यांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद या चार तालुक्यात जावून नुकसानीची पाहणी केली. त्या सर्वच ठिकाणी पवारांनी खासदार राजेनिंबाळकर यांना सोबत घेत राजकीय अनुभवाची चुणूक दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

दरम्यान भाजप आमदार पाटील आणि लातूरचे देशमुख घराणे हे कायमच एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात. कधी छुप्या तर कधी उघडपणे या दोन्ही घराण्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू असते. हाच धागा पकडत खासदार पवार यांनी लातूरकर अमित देशमुख यांची कवठा (ता. उमरगा) येथे भेट घेऊन चर्चा केली. अर्थात हा दौरा जरी नुकसानीच्या पाहणीचा असला तरी त्यामध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांना भेटून भाजप आमदार पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.

खासदार पवार रविवारी (ता.१८) तुळजापूर येथे मुक्कामी आहेत. सोमवारी (ता. १९) ते अधिकाऱ्यांकडून नुकसानीची आकडेवारी जाणून घेणार आहेत. शिवाय पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये खासदार पवार हे नेमके काय बोलतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख