Sharad Pawar said, follow Sandeep's work carefully | Sarkarnama

शरद पवार म्हणाले, संदीपची कामे लक्षपुर्वक मार्गी लावत जा ...

दत्ता देशमुख
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन शहरासह मतदार संघातील विविध विकास कामांना मंजूरी व निधीसाठी गळ घातली.

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अनेक महत्वाचे मंत्री एकत्र असल्याचा योग साधत आमदार संदीप क्षीरसागर यांनी शहर आणि मतदार संघातील विकास कामांचे प्रस्ताव मांडत मंजूरी व निधीची मागणी लाऊन धरली. शरद पवारांनीही संदीप क्षीरसागर यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे शहर व मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला.

संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे यांची भेट घेतली. ज्या मंत्र्यांशी संबंधीत कामे होती ते सर्व शरद पवार यांच्याकडे होते. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला अधिकच धार आली. पवारांनीही संदीपची कामे लक्षपूर्वक मार्गी लावत जा, अशा सुचना या मंत्र्यांना दिल्या.
 
बीडमध्ये मंजूरी मिळालेल्या जिल्हा रुग्णालयातील २०० खाटांच्या रुग्णालय इमारतीच्या बांधकामाला विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता द्यावी, या बांधकामासाठी मागच्या अधिवेशनात ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पंरतु, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अडचणी असल्याचे त्यांनी अजित पवार व राजेश टोपे यांना सांगीतले. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा बाह्यवळण रस्ता शहरा बाहेरुन गेल्याने शहरातून जाणाऱ्या १२ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे काम रखडल्याचे संदीप क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीची वेळ खासदार सुप्रिया सुळे यांनी मिळवून दिली. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोबत येण्याचे आश्वासनही दिले. बीड शहरांतर्गत रस्त्यांच्या कामासाठी व नाविन्यपूर्ण विविध विकास कामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

तसेच बिंदुसरा नदीवरील बंधारा व पुल खोलीकरण, रुंदीकरण, सुशोभीकरण आदी कामांसाठीच्या सत्तावीस कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी विशेष बाब म्हणून तातडीने निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. शहरातल्या पाणीप्रश्‍नासह सुशोभीकरण आणि पर्यटनाच्या दृष्टीने हे काम किती महत्वाचे आहे हे देखील क्षीरसागर यांनी पोटतिडकीने पटवून दिले.

 या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी झाली, परंतु, बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसामुळेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई देण्याची मागणीही संदीप क्षीरसागर यांनी केली. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख