सतरा महिन्यानंतर कॉंग्रेसची सत्तारांच्या मतदारसंघात बैठक..

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका कॉंग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात लढली. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील एकही मोठा नेता प्रचाराला जिल्ह्यात न फिरकल्याने दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेसची पाटी कोरी राहिली आणि पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आणि त्यांच्यावर संघटनेच्या पुर्नबांधणीची जबाबदारी टाकली.
Congress meeting in sataars constituency news
Congress meeting in sataars constituency news

औरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सोडल्यानंतर तब्बल सतरा महिन्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात बैठक घेतली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नव्याने संघटना बांधणीचे काम हाती घेतले आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सत्तार यांनी पक्ष सोडताच ढासळला.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगांवमध्ये पक्षाला सपाटून मार खावा लागला. कारण सत्तार म्हणजे कॉंग्रेस असेच काहीसे समीकरण जिल्ह्यात-तालुक्यात झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुध्द बंड पुकारत सत्तार यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि तालुक्यातील अख्खी कॉंग्रेसच शिवसेनेत गेली. आता कल्याण काळे यांनी पुन्हा एकदा इथे कॉंग्रेस रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरपालिकेतील सत्ता आणि सिल्लोड-सोयगाव तालुक्यात १९९५ चा दिवंगत माणिकराव पालोदकर यांचा काळ सोडला तर त्या पुढची पंधरा वर्ष या मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले होते. दोनदा किसन काळे, तर एकदा सांडुपाटील लोखंडे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण त्यांनतर सलग दहा वर्ष अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस आमदार म्हणून आणि आता तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार व राज्याचे महसुल व ग्रामविकास मंत्री म्हणून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सत्तार कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा तालुक्यात आणि जिल्हाध्यक्ष झाल्यावर जिल्ह्यात देखील त्यांच्याच शब्द चालायचा. तत्कालीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यांशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे कॉंग्रेसमध्ये तेव्हा सत्तार यांचा शब्द कधी खाली पडला नाही.

पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आधी सुभाष झाबंड यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या सत्तार यांनी उमेदवारी मिळताच टोकाचा विरोध केला. मात्र पक्षाने त्याला जुमानले नाही आणि अखेर ३०-३५ वर्ष कॉंग्रेसमध्ये राहिलेल्या सत्तारांनी कॉंग्रेसचा हात सोडत थेट शिवसेनेतच प्रवेश केला. अर्थात त्यांचे हे पक्षांतर त्यांच्या चांगलेच पथ्यावर पडले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यमंत्रीपद दिले. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यातील कॉंग्रेस अक्षरशः संपल्यात जमा आहे. गेल्या सतरा महिन्यात कॉंग्रेसचा एकही मोठा नेता किवा पदाधिकारी इकडे फिरकला नव्हता.

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका कॉंग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात लढली. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील एकही मोठा नेता प्रचाराला जिल्ह्यात न फिरकल्याने दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेसची पाटी कोरी राहिली आणि पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आणि त्यांच्यावर संघटनेच्या पुर्नबांधणीची जबाबदारी टाकली.

विशेष म्हणजे सत्तार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतांना कार्याध्यक्ष असलेले डॉ. कल्याण काळे हेच आता जिल्हाध्यक्ष झाले आहेत. तेव्हा कधीकाळी एकमेकांच्या खाद्यांला खांदा लावून काम करणारे हे दोन नेते वेगवेगळ्या पक्षात असल्याने आमने-सामने आले आहेत. काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषद सर्कल, वार्डनिहाय आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत बैठका घेत कॉंग्रेसची नव्याने बांधणी करण्यास सुरूवात केली आहे.

आज सिल्लोड- सोयगांव मतदारसंघात पक्षाची आढावा बैठक घेतली. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी काय करता येईल या संदर्भात पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली. आता राज्यमंत्री असलेल्या सत्तार यांच्या विरोधात भविष्यात तालुक्यात कॉंग्रेस किती ताकदीने उभी राहते यावर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाचे यश अवलंबून राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com