मराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पाठवा - Send a team from the Center to inspect the crop damage in Marathwada | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पाठवा

गणेश पांडे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकविलेले शेत वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर अधिच कर्जाचा डोंगर चढलेला असतांना हे संकट आल्याने शेतकरी पुर्णपणे अडचणीत सापडला आहे. अशा संकटाच्या वेळी त्याला मदत करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे.

परभणीः मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक पथक तातडीने पाठवावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात जूनच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाला, शेतकऱ्यांनी आनंदाने पेरण्या केल्या, पिकेही बहरली होती. पण गेल्या दोन महिन्यापासून मराठवाड्यात व राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पीकांसह, फळबागा आणि शेतजमीनीचे प्रचंड नुकसान झाले. कोरोनाची धोकादायक परिस्थिती आणि तिच्याशी दोन हात करण्यात राज्य सरकार व प्रशासन व्यस्त असल्याने सहाजिकच नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यावर परिणाम झाला.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून मराठवाडा व राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. शेतकऱ्यांची व्यथा स्पष्ट करतांना जाधव यांनी पत्रात नमूद केले की, गेल्या काही दिवसापासून परभणी लोकसभा मतदार संघासह संपूर्ण मराठवाडा, विदर्भात जोरदार पाउस झाला आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापशी, सोयाबीन ही नगदी पिके जोमाने वाढलेली होती. परंतू सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेतीतील कपाशी व सोयाबीनचे पिके आडवी पडली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकविलेले शेत वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर अधिच कर्जाचा डोंगर चढलेला असतांना हे संकट आल्याने शेतकरी पुर्णपणे अडचणीत सापडला आहे. अशा संकटाच्या वेळी त्याला मदत करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे. वेळीच आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्ये सारख्या दुदैवी मार्गाकडे वळेल याची भिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे केंद्र सरकारच्या संबधीत विभागातील तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक तातडीने मराठवाडा, विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती तपासण्यासाठी पाठवावे. या पथकाकडून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला जावा, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही संजय जाधव यांनी केली आहे.

Edited By : Jagdish pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख