महापालिका जिंकायची म्हणत, अमित देशमुखांचा काॅंग्रेस कार्यकर्त्यांना बुस्टर डोस..

योगायोग म्हणजे आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता काॅंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी लातूरातील या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या देशमुख-निलंगेकरांवरच औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या जेव्हा होतील तेव्हा लातूरातील या दोन्ही नेत्यांचा कस लागणार आहे.
amit deshmukh meeting with congress workers news
amit deshmukh meeting with congress workers news

औरंगाबाद ः जिल्ह्याचे प्रभारीपद मिळाल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा औरंगाबादेत दुसराच दौरा. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर वरिष्ठ नेते जिल्ह्यासाठी वेळ देत नाही, लक्ष देत नाही, असा नाराजीचा सूर स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना काढला होता. त्यानंतर अमित देशमुख यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. पण कोरोनामुळे ते देखील जिल्ह्यात फिरकले नाही. एकदा आढावा बैठकीच्या निमित्ताने आणि आता पक्षाच्या बैठकीसाठी देशमुखांचे पाय शहराला लागले. दोन तास शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला महापालिका जिंकायची आहे, कामाला लागा, असे सांगत त्यांनी बुस्टर डोस दिला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि त्या अनपेक्षित पणे काॅंग्रेसला मिळालेला वाटा यामुळे मरगळलेल्या जिल्ह्यातील काॅंग्रेसमध्ये जीव आला आहे. पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची नेमणूक केल्यानंतर हाथरस, कृषी सुधारणा विधेयक आदी मुद्यावर रस्त्यावर उतरत काॅंग्रेसने आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ओस पडलेले काॅंग्रेसचे गांधी भवन येथील कार्यालय पुन्हा गजबजायला लागले. अमित देशमुख यांची  जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर ते जिल्ह्याकडे लक्ष देतील असे वाटले होते, पण कोरोनामुळे ते राज्य आणि लातूर जिल्ह्यातच अडकून पडले.

त्यामुळे जिल्हा काॅंग्रेसला कुणी वाली आहे की नाही?  असा प्रश्न काॅंग्रेस नेते आणि माजी मंत्री अनिल पटेल यांनीच उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महिनाभराने का होईना, प्रभारी देशमुख यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा काढला आणि काल ते शहरात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तब्बल दोन तासांचा वेळ देत त्यांनी बैठकीत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. बैठकीत देशमुखांनी आगामी महापालिका निवडणुक आपल्याला जिंकायची आहे, कामाला लागा, असे आदेशही दिले.

लातूर पॅटर्न राबवणार ?

लातूर महापालिकेत भाजपची सत्ता उलथवून पुन्हा काॅंग्रेसचा महापौर करण्यात अमित देशमुख यांना यश आले. कधी नव्हे ते लातूर महापालिकेत झिरो असलेल्या भाजपने तत्कालीन मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हिरो होत सत्ता हस्तगत केली होती. पण नगरसेवकांच्या संख्या बळात फक्त दोनचे अंतर असल्यामुळे भाजपच्या हातून काॅंग्रेसने सत्ता खेचून घेतली.

योगायोग म्हणजे आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता काॅंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी लातूरातील या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या देशमुख-निलंगेकरांवरच औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या जेव्हा  होतील तेव्हा लातूरातील या दोन्ही नेत्यांचा कस लागणार आहे. लातूरच्या राजकारणातील लातूर पॅटर्न औरंगाबादेत चालणार का? याची उत्सूकता सगळ्यांनाच लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com