अन् सतीश चव्हाणांचे पाय शिवसेना कार्यालयाला लागले... - Satish Chavan's feet touched the Shiv Sena office | Politics Marathi News - Sarkarnama

अन् सतीश चव्हाणांचे पाय शिवसेना कार्यालयाला लागले...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

लातूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या चव्हाण यांनी नुकतीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोश सोमवंशी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर प्राध्यापक देखील त्यांच्या सोबत होते. ऐरवी विरोधक म्हणून शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यालयात गेल्याचे फारच कमी वेळा अनुभवयला मिळते.

औरंगाबाद ः यापुर्वी दोनवेळा सतीश चव्हाण हे आघाडीकडून मराठवाडा पदवीधरचे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडूण गेले. आता राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी- काॅंग्रेस या तीन पक्षांचे सरकार असल्याने ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे दिसते. याचा परिणाम म्हणूनच आतापर्यंत शिवसेनेवर टिका करणारे चव्हाण शिवसेना कार्यालयांना भेटी देतांना दिसत आहेत. लातूर दौऱ्यात त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराला अधिकच वेग आला. तसं गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मराठवाडा पिंजून काढत पदवीधर मतदार, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. २००८ आणि २००१४ अशा दोन निवडणुकींचा अनुभव आणि त्यात मिळालेला विजय या जोरावर हॅट्रीक साधण्यासाठी चव्हाण यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबतच महाविकास आघाडीमुळे आता शिवसेनेची देखील त्यांना मदत होणार आहे.

तेव्हा स्थानिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढवण्यावर चव्हाण यांनी भर दिल्याचे दिसून आले आहे. लातूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या चव्हाण यांनी नुकतीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोश सोमवंशी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर प्राध्यापक देखील त्यांच्या सोबत होते. ऐरवी विरोधक म्हणून शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यालयात गेल्याचे फारच कमी वेळा अनुभवयला मिळते.

पण राजकारणात काहीही अशक्य नाही हे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने दाखवून दिले. त्याचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये देखील होतांना दिसत आहे. माजी आमदार सतीश चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. तेव्हा त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांवर टिकेचा भडीमार केला होता. परंतु पुढे ही जागा काॅंग्रेसने लढवली आणि काय झाले, याचा इतिहास सगळ्यांना माहितच आहे.

पण आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांनी आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनेने आतापर्यंत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फार ताकदीने लढवली नसली तरी २००८ मध्ये सतीश चव्हाण यांच्या विजयात शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरली होती. राजू वैद्य यांनी भाजपची पंधरा हजार मते आपल्याकडे वळवल्यानेच सतीश चव्हाण यांचा विजय सोपा झाला होता.

आता याच शिवसेनेची मदत तिसऱ्यांदा निवडूण येण्यासाठी सतीश चव्हाण यांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन झाले गेले ते विसरून मला मदत करा, अशी विनंती चव्हाण करतांना दिसत आहे. कधीही शिवसेनेच्या कार्यालयाची पायरी न चढणाऱ्या सतीश चव्हाण यांचे निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, जिल्हाप्रमुखांच्या कार्यालयाला पाय लागले, याची जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Jagdish Pansare 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख