सतीश चव्हाण महाविकास आघाडीचे उमेदवार, उद्या अर्ज दाखल करणार - Satish Chavan, candidate of Mahavikas Aghadi, will file his application tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

सतीश चव्हाण महाविकास आघाडीचे उमेदवार, उद्या अर्ज दाखल करणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे मराठवाडा पदवीधरची ही जागा तिसऱ्यांदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. उद्या सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मराठवाड्यातील मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री  जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थिती राहणार आहेत.

सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिसऱ्यांदा मैदानात असणार आहे.  त्यांची लढत भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासोबत होणार आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशा थेट लढतीत चव्हाण हॅट्रीक साधणार? की भाजप धक्का देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सतीश चव्हाण यांची उमेदवारी निश्चित समजली जात असतांना पक्षाने त्यांना थेट उद्या अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे मराठवाडा पदवीधरची ही जागा तिसऱ्यांदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. उद्या सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार.विक्रम काळे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, अंबादास दानवे, रमेश बोरणारे, उदयसिंग राजपुत यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. तर आकाशवाणी जवळ सकाळी अकरा वाजता सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख