चिखल तुडवत संभाजीराजेंनी केली नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना धीरही दिला.. - Sambhaji Raje inspected the damage by treading the mud and gave patience to the farmers | Politics Marathi News - Sarkarnama

चिखल तुडवत संभाजीराजेंनी केली नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना धीरही दिला..

दत्ता देशमुख
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांना मोघम मदतीचा फायदा होणार नाही. सरकारने पॅकेज जाहीर करावे. हेक्टरी५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी नेहमीच १८ पगड जाती व १२ बलुतेदारांच्या कल्याण व उत्थानासाठी काम केले. आता अतिवृष्टीच्या दुष्काळ पाहणीसाठी त्यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपतीही केवळ बांधावरच नाही तर पँट दुमडुन चिखल तुडवित शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विशेषत: मराठवाड्यात यंदा परतीच्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे होत्याचे नव्हते केले आहे. शेतकऱ्यांची सुगी तर गेलीच आहे. मदत मिळाली नाही तर रब्बीची पेरणी कशी करायची याची चिंता शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती तीन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असून ते नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर देत आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी गेवराई तालुक्यातील नांदुरहवेली, कुंभारवाडी, सावरगाव, कोळगाव, तांदळा आदी गावांत जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तांदळा येथील शिवारात गुडगाभर पाणी आणि चिखल होता. पण, पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी पँट गुडघ्याच्यावर दुमडली आणि चिखल तुडवित आत शिरले.

शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली व धीर दिला. त्यांच्या एकूण दौऱ्यात शेतकरी मोठ्या अपेक्षेने त्यांच्याजवळ येऊन व्यथा मांडत होते. अगदी तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत, असेही प्रेमाणे शेतकरी त्यांना म्हणत होते. यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकांचे प्रेम आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केले. आपण त्यांचे वारस आहोत हेच आपल्यासाठी मोठे आहे. म्हणूनच लोक अपेक्षेने व प्रेमाणे जवळ येत आहेत. कुठल्याही पदासाठी आपण काम करत नाहीत. केवळ लोकांची सेवा करत आहोत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख