मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर प्रमुख.. - Sambhaji Patil Nilangekar in charge for Marathwada graduates .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर प्रमुख..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडा पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपची राज्यात सत्ता असतांना निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाला चांगले यश मिळाले. निलंगेकर यांनी लातूर महापालिकेत झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत होणार असली तरी हा मतदारसंघ भाजप पुन्हा ताब्यात घेणार असा दावा भाजपकडून केला जातोय. यासाठी पक्षाने माजी मंत्री व निंलग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली असून मोठ्या मताधिक्याने आपण ही जागा निवडूण आणालं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर कधीकाळी भाजपचे वर्चस्व होते. जयसिंगराव गायकवाड यांनी दोनदा तर श्रीकांत जोशी यांनी एकदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु २००८ आणि २०१४ या सलग दोन निवडणूकीत भाजपचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने या मतदारसंघावर पकड मिळवली. पैकी २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पक्षावर असलेले दुःखाचे सावट याचा परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी तर राष्ट्रवादीने हॅट्रीक साधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीकडून तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. या शिवाय प्रवीण घुगे, किशोर शितोळे, जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडा पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपची राज्यात सत्ता असतांना निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाला चांगले यश मिळाले. निलंगेकर यांनी लातूर महापालिकेत झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

काॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरात हा चमत्कार घडल्यामुळे पक्ष नेतृत्वाने निलंगेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक पाहता निलंगेकर यांच्यावर याआधीच पक्षाने प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता मराठवाडा पदवीधरसाठी देखील त्यांनाच प्रमुख करण्यात आल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले असल्याचे दिसून आले आहे. आता निलंगेकर पदवीधर मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देतात का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख