मराठवाड्यातील रस्ते, पुल दुरुस्तीसाठी साडेपाचशे कोटी देणार... - Roads and bridges in Marathwada will be given Rs. 550 crore | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाड्यातील रस्ते, पुल दुरुस्तीसाठी साडेपाचशे कोटी देणार...

जगदीश पानसरे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

मला फक्त सहा महिनेच झाले, जरा थांबा, मी खड्डे बुजवण्याची अशी कोणतीही तारीख देणार नाही, पण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ज्या ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचे नुकसना झाले आहे, त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन नक्की देतो. यासाठी मी मराठवाड्याला साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी या मेळाव्यात जाहीर केले.

औरंगाबाद ः गेल्या तीन महिन्यात मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांची दुरावस्था झाली आहे. अनेक लोक माझ्याकडे या बाबत तक्रार करतात, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, लवकरच हे रस्ते आणि पुल दुरूस्त केले जातील, त्यासाठी मी साडेपाचशे कोटी रुपये मराठवाड्याला देणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याला निश्चितच झुकते माप देईन, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सेवादलाच्या मेळाव्यात दिले.

औरंगाबाद तालुक्यात सेवादलाच्या वतीने केंद्र सरकारच्या कामागार व शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात जनजागृतीसाठी मेळावा घेण्यात आला. अशोक चव्हाण यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी मराठवाड्यात सेवा दल व जिल्हा काॅंग्रेसने पत्रक छापून शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांना या कायद्यात नेमक काय आहे हे सांगितल पाहिजे. लोकांना याबद्दल काहीच माहिती नाही. मराठवाडा हा संताची भूमी म्हणून आपलं शांत चालू आहे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्यातील रस्त्यांवर जेव्हा खड्डे पडायचे तेव्हा भाजप सरकारमधील मंत्री ज्यांच्याकडे हे खाते होते ते चंद्रकांत पाटील डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवले जातील असे सांगायचे. असे किती डिसेंबर गेले, पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. आता विरोधक मला प्रश्न विचारतात. मी त्यांना सांगितले, मला फक्त सहा महिनेच झाले, जरा थांबा, मी खड्डे बुजवण्याची अशी कोणतीही तारीख देणार नाही,

पण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ज्या ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचे नुकसना झाले आहे, त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन नक्की देतो. यासाठी मी मराठवाड्याला साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी या मेळाव्यात जाहीर केले. तसेच औरंगाबादला या निधी वाटपात निश्चितच झुकते माप दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औताडे तुमच्याकडे राहुल गांधींचे लक्ष,,

अशोक चव्हाण यांनी यावेळी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या कामाचेही कौतुक केले. राज्यात सेवादलाचे काम चांगले आहे. ते अधिक चांगले करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गांभीर्याने काम करावे. औताडे यांनी विपरित परिस्थितीत दोन निवडणुका लढवल्या, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. सेवादलाच्या माध्यमातून तुम्ही जे काम करतायेत त्याकडे आपले नेते राहुल गांधी यांचे लक्ष आहे,आणि ते निश्चितच तुमचं चांगल करतील, असा दिलासाही अशोक चव्हाण यांनी औताडे यांना यावेळी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख