राऊत-फडणवीस यांच्या भेटीला महत्व द्यायची गरज नाही... - Raut-Fadnavis meeting need not be given importance ... | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत-फडणवीस यांच्या भेटीला महत्व द्यायची गरज नाही...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, तुम्हीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावरही शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे नेते आहेत. त्यामुळे जनता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही नेहमीच अशा भेटीगाठी घेत असतो, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद ः संजय राऊत हे एका दैनिकाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे दोन पक्षांचे नेते एकत्र भेटले तर त्यावरून तर्क वितर्क लावणे चुकीचे आहे. त्यामुळे संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीला जास्त महत्व देण्याची गरज नाही, मिडियानेही ते देऊ नये, अशा शब्दांत महसुल मंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषी सुधारणा विधेयक राज्यात लागू न करण्याच्या विषयावर महाविकास आघाडीतील आम्ही सगळे पक्ष एकत्रितपणे निर्णय घेणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी सांगितले.

कृषी सुधारणा विधेयक, राऊत-फडणवीस, मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार भेट या विषयावर कॉंग्रसेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका मांडली. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच त्यांनी कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे सांगतिले. शिवसेनचे नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या गुप्त बैठकी बद्दल विचारले असता थोरात म्हणाले, या भेटीची एवढी चर्चा करणे आणि महत्व देणे चुकीचे आहे. राऊत यांनी मुलाखती संदर्भात फडणवीस यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. दोन पक्षांचे नेते भेटणे यात काही गैर आहे असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे मिडियाने देखील या भेटीला फार महत्व देण्याची गरज नाही.

कृषी सुधारणा विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत त्याच्या बाजूने मतदान केले, राज्यसभेतही त्यांची भूमिका विधेयकाच्या बाजूची होती, याकडे थोरातांचे लक्ष वेधले असता या संदर्भात शिवसेनाच आपली भूमिका सांगू शकेल आपण त्यांनाच विचारावे असे म्हणत यावर अधिक भाष्य करणे टाळले. फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, तुम्हीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावरही शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे नेते आहेत. त्यामुळे जनता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही नेहमीच अशा भेटीगाठी घेत असतो, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

शिवसेना हा कन्फ्यूज पक्ष आहे या फडणवीस यांच्या टिकेलाही थोरात यांनी उत्तर दिले. शिवसेना अजिबात कन्फ्यूज नाही त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. कृषी विधेयकावर देखील ते आपली भूमिका मांडतील. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आधारभूत किंमत संपवण्याचे काम नव्या कृषी सुधारणा विधेयकातून होणार आहे, त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रात लागू न करण्या संदर्भात लवकरच तीन्ही पक्ष एकत्रि बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख