रमेश पोकळे भाजपचा सच्चा कार्यकर्ता, त्याची समजूत काढण्यात यश येईल.. - Ramesh Pokale is a true BJP worker, he will be able to come to an understanding | Politics Marathi News - Sarkarnama

रमेश पोकळे भाजपचा सच्चा कार्यकर्ता, त्याची समजूत काढण्यात यश येईल..

जगदीश पानसरे
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

रमेश पोकळे यांनी काल गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द त्यांनी बंडखोरी केल्याचे दिसते. यावर भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पंकजा मुंडे येणार की नाही? अशी शंका देखील उपस्थित केली जात होती. परंतु पंकजा मुंडे यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्धघाटन आणि मेळाव्याला हजेरी लावत या चर्चांना पुर्णविराम दिला.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही भाजपकडून प्रवीण घुगे आणि रमेश पोकळे या दोन पंकजा मुंडे समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे. पदवीधरची उमेदवारी देतांना विचारात न घेतल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र मी नाराज नाही, अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मी उपस्थित आहे, यातच सगळे आले. राहिला प्रश्न रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा, तर रमेश भाजपचा सच्चा आणि समजुतदार कार्यकर्ता आहे. तो नक्कीच समजून घेईल, त्याची समजूत काढण्यात नक्कीच यश येईल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे इच्छूक होते. ते पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पोकळे यांना जेव्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून भाजपमध्ये आणले होते, तेव्हाच त्यांना मोठी संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर भाजपकडून पोकळे यांनी उमेदवारीवर दावा सांगतिला होता. मात्र तेव्हाही त्यांना संधी मिळाली नाही. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत पोकळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला होता.

पण गेल्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे अचानक निधन झाले आणि पक्षावर शोक पसरला. याच दरम्यान मराठवाडा पदवीधरची निवडणूक झाली आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची मानसिकताच राहीली नव्हती. त्यामुळे शिरीष बोराळकर यांना एक संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली. पंकजा समर्थक पोकळे यांना डावलल्यामुळे त्या नाराज आहेत, म्हणूनच औरंगाबाद येथील बैठकीला त्या आल्या नाहीत, अशी देखील जोरदार चर्चा होती.

दरम्यान, रमेश पोकळे यांनी काल गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द त्यांनी बंडखोरी केल्याचे दिसते. यावर भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पंकजा मुंडे येणार की नाही? अशी शंका देखील उपस्थित केली जात होती. परंतु पंकजा मुंडे यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्धघाटन आणि मेळाव्याला हजेरी लावत या चर्चांना पुर्णविराम दिला.

एवढेच नाही तर रमेश पोकळे हा भाजपचा सच्चा व समजुतदार कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही त्याची समजूत काढण्यात यशस्वी होऊ, असे सांगत मी नाराज नाही, कार्यकर्त्यांनी बोराळकर यांना निवडूण आणण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले. आता पोकळे यांची समजूत काढून पंकजा त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावतात की मग पोकळे आपली उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी करतात हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख