दीपस्तंभ प्रतिष्ठानने मला राजकारणात आणले (राजकीय प्रवास मेघना बोर्डीकरांचा)
Meghana Bordikar Political Journey

दीपस्तंभ प्रतिष्ठानने मला राजकारणात आणले (राजकीय प्रवास मेघना बोर्डीकरांचा)

घरातील राजकीय वातावरण लहानपणापासूनच अंगवळणी पडले होते. पण राजकारणातील चढउतार, स्पर्धा, संघर्ष पाहता राजकारणात जायचे नाही आणि फक्त समाजसेवा करायची अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. पण भविष्यात राजकारणात यावेच लागले असे सांगत आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला

परभणी : माझे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे परभणी जिल्ह्याच्या राजकीय पटलावरचे प्रभावशाली नेतृत्व त्यांची राजकीय वाटचाल जितकी यशस्वी तितकीच संघर्षमय देखील आहे. जिल्ह्यातील राजकारणाची सुत्रे अनेक वर्षांपासून आमच्या घरातूनच हलतांना मी बघितलेली आहेत. त्यामुळे वडीलांकडूनच मला राजकीय वारसा मिळाला.

घरातील राजकीय वातावरण लहानपणापासूनच अंगवळणी पडले होते. पण राजकारणातील चढउतार, स्पर्धा, संघर्ष पाहता राजकारणात जायचे नाही आणि फक्त समाजसेवा करायची अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. पण भविष्यात राजकारणात यावेच लागले. दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करत असतांना मी राजकारणात सक्रीय व्हावे असा आग्रह प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांचा होता. तो मला मोडता आला नाही आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझी राजकीय क्षेत्रात एन्ट्री झाली.

दीपस्तंभ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून 2010 साली समाजसेवेला सुरुवात केली. तरूणांना रोजगार, शिक्षण व पर्यावरण या तीन विषयावर लक्ष केंद्रीत करून या क्षेत्रात भरीव काम करण्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न साकार करण्यासाठी सलग दोन वर्ष जीवापाड मेहनत घेतली. जिंतूर - सेलूच नाही तर जिल्ह्यातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी भरती प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून हजारो तरूणांना सरकारी नोकऱ्यांची द्वारे खुली करून दिली.

पर्यावरण क्षेत्रात काम करतांना पाणी आडवा - पाणी जिरवा या मोहिमेत सहभागी झाले. पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून जिंतूर तालुक्‍यात पाणी बचावची मोठी चळवळ सगळ्यांच्या सहकार्यातून उभी करता आली याचा देखील आनंद होता. दीपस्तंभच्या त्या दोन वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण जिल्ह्यात तरूणांचे मोठे जाळे निर्माण झाले. समाजसेवेत रमले असतांना कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रवेश करून समाजीक कार्याला बळ देण्याची गळ घातली.

इच्छा नसतांना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 2012 मध्ये परभणी जिल्हा परिषदेच्या बोरी (ता.जिंतूर जि.परभणी) या गटातून निवडणुक लढवली. पहिल्याच निवडणुकीत यश मिळाले आणि आपला निर्णय योग्य असल्याची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात माझ्यावर काही काळासाठी युवक कॉग्रेसच्या लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली होती, ती देखील मी समर्थपणे सांभाळली.

मतदारसंघ आणि घरही महत्वाचे

राजकारणात आल्यानंतर 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघासाठी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. समाजसेवेला राजकारणाचे पाठबळ असल्याशिवाय लोकांची कामे करता येत नाही याचा अनुभव मी घेतला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्‍न सोडवत असतांना जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेत नेतृत्व करण्याची इच्छा होती. पण काही कारणामुळे ते जमले नाही. पण भाजपने मला जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि मतदारांनी मला विधानसभेत पाठवले.

कुटुंब आणि राजकारण तारेवरची कसरत

आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील कामाचे नियोजन करत असतांना मी कधीही माझ्या कुटूंबावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. दर शनिवार व रविवार पूर्ण दोन दिवस पुण्यात फक्त माझ्या कुटूंबीयांसाठी मी वेळ देते. उर्वरित सोमवार ते शुक्रवार हा मतदारसंघातील कामांना वेळ ठरवून दिलेला आहे. घर आणि मतदारसंघ सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागते, ओढाताण होते परंतू आता सवय झाली आहे.

माझे पती हे भारतीय पोलिस सेवेते आहेत. पती प्रशासकीय अधिकारी व मी राजकारणात असे विरुध्द टोक आहे. पंरतू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला मतदारसंघ आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या. मी आमदार झाल्याचा आनंद माझे पती, मुलं, आई वडील यांना आहेच. परंतू माझ्या सासु-सासऱ्यांना सर्वाधिक आनंद वाटतो. कारण माझ्या कुटुंबातील बहुतांश सदस्य प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर आहेत. मी एकटी सुन राजकारणात आहे, त्यामुळे आपल्या घरी देखील आमदार आहे याचा आनंद माझ्या सासु-सासऱ्यांना अधिक आहे.

(शब्दांकन : गणेश पांडे)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in