पंकजा मुंडेंच्या निवडीमुळे पक्षबळकटीलाही मदत.. - Pankaja Munde's selection also helps the party | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडेंच्या निवडीमुळे पक्षबळकटीलाही मदत..

दत्ता देशमुख
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

मधल्या काळात भाजप व पंकजा मुंडे यांच्यातील अनेक घटनांमधून हा वाढता दुरावा राज्याने पाहिला. पण, आजघडीचे वास्तव पाहीले तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीचा आशिर्वाद आहे.  पंकजा मुंडे लोकांत स्थान असलेल्या आणि फक्त नावावर लोक जमा करण्याची ताकद असणाऱ्या नेत्या. त्यांनी अंग काढल्यानंतर भाजपची कशी फजिती होते हे मधल्या काळातील काही आंदोलनांतून दिसले.

बीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले. पण, रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर पक्षाने त्यांचा सन्मान करत त्यांना राष्ट्रीय सचिवपदावर स्थान दिले. त्यांची निवड भाजपच्या बळकटीसाठीही मोलाची ठरणार आहे.

भाजपच्या आताच्या सर्व नेत्यांमध्ये पॉवरफुल कोणीही असले तरी मास लिडर अशी पंकजा मुंडे यांची महाराष्‍ट्रात ओळख आहे. त्यांचे समर्थकही दूरवर आहेत, त्यामुळे पंकजा यांना राष्ट्रीय कार्यकारणीत मिळालेले स्थान व त्याचे परिणाम भविष्यात दिसतील. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचाल देखील राज्यातून पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, उपाध्यक्ष अशा पदांवर झाली. पंकजा मुंडे देखील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या, उत्कृष्ट वक्त्या, व संघटन कौशल्यसाठी ओळखल्या जातात. 

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांची ‘एल्गार’यात्रा आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर 'पुन्हा संघर्ष यात्रा' काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता.  भाजपची राज्यात सत्ता आणण्यात त्यांचा वाटा विसरण्यासारखा नाही. मंत्री म्हणूनही त्यांचे काम उत्तम राहीलेले आहे. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला. मात्र, याच काळात पक्षातील काही नेत्यांमध्ये व त्यांच्यात दरी पाडणारा एक गट तयार झाला होता. 

सत्ता आली, त्या मंत्रीही झाल्या, महत्वाची खातेही मिळाले. पण, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात जाणिवपूर्वक दुरावा तयार करुन तो वाढविण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे झाले. पंकजा मुंडे या लोकनेत्या असल्याने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात भिती निर्माण केली जाऊ लागली. त्यातूनच त्यांचे खाते कमी करणे, खात्याला त्यांच्या मर्जीविरुद्धचा प्रधान सचिव देणे असे प्रकार घडले. तसे, टाळी एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने वाजली.

दरम्यान, पंकजा परळीतून पराभूत झाल्याने ही दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. मधल्या काळात भाजप व पंकजा मुंडे यांच्यातील अनेक घटनांमधून हा वाढता दुरावा राज्याने पाहिला. पण, आजघडीचे वास्तव पाहीले तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीचा आशिर्वाद आहे.  पंकजा मुंडे लोकांत स्थान असलेल्या आणि फक्त नावावर लोक जमा करण्याची ताकद असणाऱ्या नेत्या. त्यांनी अंग काढल्यानंतर भाजपची कशी फजिती होते हे मधल्या काळातील काही आंदोलनांतून दिसले. मात्र, आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान दिल्याने त्याचा आगामी काळातील नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत फायदा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

बीडसह, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, पुणे अशा राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांना व्यक्तीगत मानणारा मोठा वर्ग आहे. सरकार विरुद्धच्या आवाजात जोर निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत असण्याचा भाजपला निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. आता त्यांनीही या पदाच्या माध्यमातून पुन्हा जोशाने मैदानात उतरुन संधीचे सोने करण्याची गरज आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख