चंद्रकांत पाटलांनी केलेले खड्डे बुजवण्याचे काम आमच्या नशिबी.. - Our destiny is to fill the pits made by Chandrakant Patil. | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांनी केलेले खड्डे बुजवण्याचे काम आमच्या नशिबी..

गणेश पांडे
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी मराठवाड्याला साडेपाचशे कोटी रुपये देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी ५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, पुल लवकरच दुरूस्त केले जातील.

परभणी ः भाजप सरकारच्या काळात राज्यातील रस्त्याची कामे दर्जाहीन झाली. त्यामुळे  तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजविण्याचे काम आमच्या नशिबी आले, असा टोला राज्याचे सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी लगावला. डिसेंबरपर्यंत रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असे मह्णत पाटील नेहमी तारखा द्यायचे, मी मात्र अशा तारखा देणार नाही, पण रस्त्यांची कामे निश्चित होतील, हे आश्वासन देतो, असेही चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण सध्या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांची झालेली दुरावस्था आणि शेतीच्या नुकसानाची पाहणी करत आहेत. औरंगाबाद, जालन्या नंतर ते परभणीत आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आढावा घेतला. त्यानंतर पत्रकरांशी बोलतांना त्यांनी भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही.

चव्हाण म्हणाले,भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांची कामे ही दर्जाहीन करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजविण्याचे आमच्या नशिबी आले आहे. पण महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी मराठवाड्याला साडेपाचशे कोटी रुपये देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी ५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, पुल लवकरच दुरूस्त केले जातील.

गोदावरीसह अन्य मोठ्या नद्यांच्या काठावरील रस्ते हे अवघ्या दोन वर्षात वाळूवाहतुक करणार्‍या अवजड वाहनांमुळे उखडू लागले आहेत. त्यामुळेच नदी काठावर सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांचीच गरज आहे, दोन वर्षात हे रस्ते जैसे थे अवस्थेत येत आहेत. वाळू उपसा करणार्‍या यंत्रणांसह वाहनांच्या वाहतुकीमुळेच या रस्त्यांची अवस्था दयनीय होत आहे.

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर महसूल व पोलिस यंत्रणेव्दारे कारवाया होत आहे. परंतु भविष्यात नदीकाठावरील रस्त्यांच्या क्रीटीकरणाशिवाय पर्याय नाही असेही अशाेक चव्हाण यांनी सांगितले.  यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सुरेश नागरे यांच्यासह बांधकाम खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

Editd By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख