कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू - The number of corona patients is around five thousand, four days public curfew in Parbhani | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू

गणेश पांडे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ठ झाले आहे.  त्याला प्रतिबंध घालण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबविणे हाच आहे. हे संक्रमण थांबवायचे असेल तर जनता कर्फ्यू ही संकल्पना १०० टक्के अमलात आणून ती यशस्वी करावी लागणार आहे. त्यामुळे नागरीकांना अत्यावश्यक सेवा त्याच पध्दतीने दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

परभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान चार दिवसाच्या या जनता कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना, कारखाने व इतर उद्योग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी सांयकाळी दिले.

परभणी जिल्हयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तब्बल पाच हजार रुग्ण संख्येच्या दिशेने जिल्हा वाटचाल करत आहे. दिवसगणिक ५० रुग्णांच्यावर  संख्या वाढत आहे. महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रॅपीट अन्टीजन टेस्टच्या माध्यमातून रुग्ण शोधण्याची मोहिम शहरात राबविली जात असल्याने यातूनही दररोज रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा पाच हजाराचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तसेच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संख्ये सोबत जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हा आकडा देखील २०० च्या पुढे गेला आहे. मृत्यु दरात परभणी जिल्हा राज्यात आघाडीवर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या संसर्गाच्या प्रसाराला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा वेगाने काम करत आहे. परंतू रुग्णांची वाढती संख्या ही डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आता जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

या जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय, प्रवाशी वाहतुक करणारे खासगी वाहने, सर्व दुकानदार, छोटे मोठे बाजार लघू व कुटीर उद्योग,  शासकीय, निमशासकीय सेवा यांना बंद ठेवण्यात येणार आहे. परंतू अत्यावश्यक सेवामध्ये औषधी दुकाने, दवाखाने यांना मात्र सुट असणार आहे.

 कोव्हिड - १९ डॅशबोर्ड कार्यान्वित

कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी रुग्णांना त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय सुविधानुसार वैद्यकीय सेवा देण्यासाठी निर्देशित केले आहे. अशा सर्व रुग्णालयातील सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी एनआयसी मार्फत परभणी जिल्हा कोव्हिड - १९ डॅशबोर्डची निर्मिती केली आहे.

या डॅशबोर्डवर जिल्ह्यात केलेल्या एकूण कोव्हिड चाचण्या, एकूण रुग्णसंख्या, उपचार पूर्ण झालेले रुग्ण, मृत्यू आणि सध्या उपचार घेत असलेल्या व्यक्तींची दैनंदिन आकडेवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या माहितीसोबत जिल्ह्यातील एकूण कोव्हिड सेंटर, एकूण बेड आणि सध्या उपलब्ध असणारे बेड ही आकडेवारी दिसणार आहे. जिल्ह्यातील सर्व कोव्हिड उपचार केंद्राची यादी आणि केंद्रनिहाय उपलब्ध बेडची संख्यासुध्दा ह्याच डॅशबोर्डवर प्रदर्शित होणार आहे. 

निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढला- मुगळीकर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार वाढलेला असतांनाही नागरीकांची बेफिकरी दिसून येत आहे. नागरीकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ठ झाले आहे.  त्याला प्रतिबंध घालण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबविणे हाच आहे. हे संक्रमण थांबवायचे असेल तर जनता कर्फ्यू ही संकल्पना १०० टक्के अमलात आणून ती यशस्वी करावी लागणार आहे. त्यामुळे नागरीकांना अत्यावश्यक सेवा त्याच पध्दतीने दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By: Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख