काॅंग्रेस जिल्हाध्यक्षांनी माजी विधानसभा अध्यक्षांची लाज काढली.. - Not ashamed to support onion export ban | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेस जिल्हाध्यक्षांनी माजी विधानसभा अध्यक्षांची लाज काढली..

माधव इतबारे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधेयकाला विरोध केला नाही म्हणजे त्यांचा पाठींबाच आहे,’ असे वक्तव्य बागडे यांनी केले. हे कधीपासून शरद पवार यांच्या करंगळीला धरून संसार करू लागले?  पवार यांनी आजच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कांदा निर्यातबंदीचे बागडे यांनी समर्थन केले. एवढे वय झाले, अशी भूमिका घ्यायला त्यांना लाज वाटली नाही का? अशी टीकाही काळे यांनी केली.

औरंगाबाद ः केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या आड शेती उद्योगपतींच्या घशात घालण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. देशभर या विधेयकाला विरोध होत असल्याने कधी नव्हे एवढे पंतप्रधानांना समोर येऊन बोलावे लागत आहे. भाजप नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी कांदा निर्यात बंदीचे समर्थन केले. त्यांचे एवढे वय झाले. शेतकरी विरोधी धोरणांचे समर्थन करताना लाज वाटली नाही का? अशा शब्दात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी बागडे यांच्यावर टीका केली. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करतांनाच जिल्ह्यात ओला दुष्काळ जारी करा, अशीही मागणी त्यांनी केली. कृषी विधेयकासह अन्य विषयावर भाष्य करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कल्याण काळे यांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर टिका केली.

काळे म्हणाले, कृषी विधेयक कसा क्रांतिकारी निर्णय आहे, हे भासविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र त्यांच्या सहकारी पक्षाच्या मंत्र्याने राजीनामा का दिला? आत्तापर्यंत शेतीमाल साठवणुकीसाठी मर्यादा होत्या. या विधेयकामुळे शेतकऱ्याच्या जमीनी उद्योजकांच्या घशात जाणार असून, त्यांना अमर्याद साठवणुकीची संधी मिळणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधेयकाला विरोध केला नाही म्हणजे त्यांचा पाठींबाच आहे,’ असे वक्तव्य बागडे यांनी केले. हे कधीपासून शरद पवार यांच्या करंगळीला धरून संसार करू लागले?  पवार यांनी आजच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कांदा निर्यातबंदीचे बागडे यांनी समर्थन केले. एवढे वय झाले, अशी भूमिका घ्यायला त्यांना लाज वाटली नाही का? अशी टीकाही काळे यांनी केली.

ओला दुष्काळ जाहीर करा.. 

जिल्ह्यात दीडशे टक्के पाऊस झाला असून, पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख