महापालिका निवडणूकीत वंचित एमआयएमशी आघाडी करणार नाही.. - No Aliance with MIM in municipal elections | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिका निवडणूकीत वंचित एमआयएमशी आघाडी करणार नाही..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

लोकसभा निवडणूक एकत्रित लढल्यानंतर आणि त्यात औरंगाबाद मतदारसंघात एमआयएमला विजय मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मतभेद वाढले होते. मुस्लिमांनी वंचितला मतदान केले नाही, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघात पराभव झाल्यानंतर एमआयएमवर केला होता. परिणामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

औरंगाबाद ः आगामी महापालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघा़डी एमआयएमशी कुठल्याही परिस्थीतीत आघाडी करणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या वंचित आणि एमआयएमने त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका मात्र स्वतंत्रपणे लढल्या होत्या. आता महापालिका निवडणुकीत हे पक्ष पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर एमआयएमसोबत आघाडी नाही, असे एका वाक्यात सांगत आंबेडकरांनी हा विषय संपवला.

प्रकाश आंबेडकर औरंगाबाद येथे आले असतांना त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी बिहार निवडणुकीच्या निकालासह आरक्षण, लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात आपली भूमिका मांडली. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत वंचित एमआयएम सोबत आघाडी करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा वंचित स्वतंत्रपणे लढणार, एमआयएमशी आघाडी करणार नाही, अशा मोजक्या शब्दात त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

लोकसभा निवडणूक एकत्रित लढल्यानंतर आणि त्यात औरंगाबाद मतदारसंघात एमआयएमला विजय मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मतभेद वाढले होते. मुस्लिमांनी वंचितला मतदान केले नाही, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघात पराभव झाल्यानंतर एमआयएमवर केला होता. परिणामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या बोलणीवरून देखील ओवेसी, इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध बिघडले होते. जागा वाटपाची बोलणी मी ओवेसी यांच्यांशीच करेन, इम्तियाज जलील कोण? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. तेव्हापासून नाराज असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएमसोबत न लढता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख