ऊसतोड मजुरांच्या मिटणाऱ्या संपातून नव्या पक्षांतर्गत संंघर्षाची थिणगी .. - New inter-party struggle over the disappearance of sugarcane workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ऊसतोड मजुरांच्या मिटणाऱ्या संपातून नव्या पक्षांतर्गत संंघर्षाची थिणगी ..

दत्ता देशमुख
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

गोपीनाथराव मुंडे यांना भाजमध्ये विरोध झाला असला तरी जिल्ह्यात पक्षीय विरोध कधी झाला नाही. तोच पायंडा मागच्या पाच वर्षांच्या सत्तेत पंकजा मुंडे यांच्या बाबतीतही होता. पण, भाजपच्या सहयोगी पक्षातील विनायक मेटे व त्यांच्यातून कधीही विस्तव आडवा गेला नाही. आता त्याच धर्तीवर पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यात नवा अध्याय सुरु झाला आहे.

बीड : ऊसतोड मजूरांचा जिल्हा ही बीडची ओळख नवी नाही. मजूरांचे अनेक प्रश्न असले तरी अधुन मधून त्यांच्या प्रश्नांवर आंदोलने होतात आणि मिटतातही. त्यातून मजूरांच्या हाती किती पडते यापेक्षा त्या काळात राजकारण चांगलेच तापते हे महत्वाचे. यंदाही आंदोलन झाले आणि अनेक संघटना, पक्षांच्या नेत्यांनी यात उड्या घेतल्या. आता मजूरांच्या हाती ठोस काय लागणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी आजघडीला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि पक्षाचेच आमदार सुरेश धस यांच्यात पेटलेला वणवा हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. 

बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाची पाने उलगडली तर दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांतील युद्धांपेक्षा पक्षांतर्गत कुरबुरी आणि संघर्ष अधिक पहायला मिळतो. अगदी ७० - ८० च्या दशकात एकत्र असलेले द्वारकदास मंत्री व श्रीपतराव कदम, केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात असत. पुढे याच काँग्रेस पक्षातील शिवाजीराव पंडित व केशरबाई क्षीरसागर यांच्यातील गटबाजीही जिजल्ह्याने पाहिली. त्याकाळी शेतकरी कामगार पक्ष व कम्युनिस्ट पक्ष हे ताकदवान असले तरी राजकीय ताकद व संस्थांवर वर्चस्व काँग्रेसचे असे आणि त्यातून पक्षीय युद्ध पेटलेले असे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय उदयानंतर जिल्ह्यात भाजपने हळुहळु बाळसे धरले. त्यांनी मात्र विरोधाच्या राजकारणापेक्षा कायम बेरजेचे राजकारण केले. तेव्हाची काँग्रेस आणि नंतरच्या राष्ट्रवादीतून त्या - त्या परिस्थितीत कधी बाबुराव आडसकर, राधाकृष्ण होके, अमरसिंह पंडित या नेत्यांना बरोबर घेऊन क्षीरसागरांना सत्तेपासून दुर ठेवले. राष्ट्रवादीच्या मागच्या चलतीच्या काळातही जयदत्त क्षीरसागर विरुद्ध अमरसिंह पंडित, सुरेश धस, प्रकाश सोळंके असे चित्र असे. तर, मागच्या वेळी जयदत्त क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे व सर्व असे चित्र होते.

पण, जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय कलगीतुरा रंगतो तो पक्षांतर्गत विरोधामुळे. आता पुन्हा त्याचाच नवा अध्याय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निमित्ताने पहायला मिळत आहे. गोपीनाथराव मुंडे यांना भाजमध्ये विरोध झाला असला तरी जिल्ह्यात पक्षीय विरोध कधी झाला नाही. तोच पायंडा मागच्या पाच वर्षांच्या सत्तेत पंकजा मुंडे यांच्या बाबतीतही होता. पण, भाजपच्या सहयोगी पक्षातील विनायक मेटे व त्यांच्यातून कधीही विस्तव आडवा गेला नाही. आता त्याच धर्तीवर पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यात नवा अध्याय सुरु झाला आहे.

ऊसतोड मजूरांचे नेतृत्व पुर्वी कायम दिवंगत गोपीनाथराव मुंडे आणि पुढे पंकजा मुंडे यांनी केले. मुंडे लवादातही आहेत. त्यांच्या सत्ताकाळात झालेल्या संपावेळी संप मिटविताना त्यांनी कारखानदार धार्जिणी भुमिका घेतल्याचा आरोप इतर पक्ष आणि संघटना आजही करत आहेत. यंदाही संप सुरु झाला तेव्हा नेमके पंकजा मुंडे परदेशात होत्या. याच वेळी भाजपने संपाची अधिकृत जबाबदारी पक्षाचे आमदार सुरेश धसांवर दिली. मजूरांना दिडशे टक्के दरवाढ द्यावी, अशी मागणी करत धसांनी भाजपच्या झेंड्याखाली राज्यभर रान पेटविले.

इकडे दसरा, तर तिकडे मजुरांचा मेळावा..

पण, पंकजा मुंडे यांची भुमिका यात वेगळी दिसली. सुरुवातीला सौम्य वाटणाऱ्या दोघांच्या भुमिका आता तिव्र विरोधी असल्यावर दसरा मेळाव्यात शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीला संपात कोणीही लुडबुड करु नये असे पत्रकात म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात तर मजूरांचे प्रश्न सोडविणाऱ्यांना उत्तर प्रदेशात पाठवावे लागेल असा टोला लगावला आहे. त्यांनी २१ रुपयांची दरवाढ अपेक्षीत धरुन कारखान्याला निघा असे फर्माण बजावलेले असताना धसांनीही पुढचे पाऊल टाकत ‘संप आणखी सुरु आहे, मंगळवारी खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीत तोडगा निघेल तेव्हाच जावे, अशी भुमिका मांडली.

या दोन परस्परविरोधी भुमिकांने रान पेटलेले असतानाच कहर झाला तो धसांच्या मतदार संघात सावरगाव घाटला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरु असताना इकडे आष्टीत सुरेश धस यांचा ऊसतोड मजूर व मुकादमांचा मेळावा सुरु होता या घटनेने. दरम्यान, सुरेश धस हे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत असताना त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत थेट भाजपला मदत केली. त्यानंतर भाजपने त्यांना लातूर - उस्मानाबाद - बीड मतदार संघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख