राष्ट्रवादीच्या एका सदस्याने पंचायत समितीतील भाजपची सत्ता उलटवली - A NCP member overthrew the BJP in the Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या एका सदस्याने पंचायत समितीतील भाजपची सत्ता उलटवली

युवराज धोतरे
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

भाजपात निर्माण झालेली गटबाजी व कुणाचे नियंत्रण न राहिल्याने सत्ता असूनही उपयोग होत नसल्याच्या अनेक तक्रारी पंचायत समिती सदस्यांनी वारंवार केल्या होत्या. याचा फायदा विरोधकांना झाला असून नऊ पैकी सहा सदस्य गळाला लावण्यात ते यशस्वी झाले. विशेष म्हणजे तीन वर्षे सभापती पदाचा उपयोग घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उदगीर : राज्यात नऊ महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा राजकीय चमत्कार घडवत १०५ आमदार असलेल्या भाजपला सत्तेच्या बोहर फेकत महाविकास आघाडीची सत्ता आणली. ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर स्वतःच्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची खाती घेतली. हा इतिहास ताजा असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तालुका पातळीवर देखील हे प्रयोग यशस्वी करून दाखवत आपल्या नेत्यांचा आदर्श अमंलात आणला आहे. उदगीर पंचायत समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व आणि सत्ता असलेल्या भाजपला अंतरविरोधाचा फटका बसला आणि नाराजींची मोट बांधत राष्ट्रवादीच्या केवळ एका सदस्याने भाजपची सत्ता घालवली.

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहुल केंद्रे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड, दोन माजी आमदार व एक प्रदेशाचे महामंत्री हे उदगीरचे असूनही येथील पंचायत समिती भाजपला राखता आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. उदगीर पंचायत समितीमध्ये भाजपाचे नऊ सदस्य आहेत. राष्ट्रवादीकडे केवळ एक, काँग्रेसकडे तीन तर शिवसेनेकडे एक एवढे संख्याबळ आहे. निर्विवाद बहुमत असतानाही भाजपचे सहा सदस्य विरोधात गेले आणि सत्ताही गेली. हे असे का घडले? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता भाजपावर आली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती माजी आमदार गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे हे दिग्गज उदगीरात कार्यरत असताना व गेल्या दोन महिन्यापासून हे सदस्य नाराज असल्याचे माहित असूनही पंचायत समितीत सत्तांतर का घडले, याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून या दिग्गजांमध्ये गटबाजी निर्माण झाली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्रे यांना संधी मिळाली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदावरही रमेश कराड यांना संधी मिळाली.

केंद्रे समर्थक राठोड यांना निष्ठावंतांना डावलून जिल्हा परिषदेत सभापतीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या तालुका अध्यक्षपदाच्या निवडीत गटबाजी उफाळून आली होती. हळूहळू उदगीर भाजपाचे सर्व सूत्रे केंद्रे कुटुंबीयांकडे गेल्याने इतर सदस्य नाराज असल्याची चर्चा होती. या सर्व भाजपाच्या परिस्थितीचा फायदा विरोधकांनी घेतला.

भाजपात निर्माण झालेली गटबाजी व कुणाचे नियंत्रण न राहिल्याने सत्ता असूनही उपयोग होत नसल्याच्या अनेक तक्रारी पंचायत समिती सदस्यांनी वारंवार केल्या होत्या. याचा फायदा विरोधकांना झाला असून नऊ पैकी सहा सदस्य गळाला लावण्यात ते यशस्वी झाले. विशेष म्हणजे तीन वर्षे सभापती पदाचा उपयोग घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, अविश्वास ठरावाच्या वेळी भाजपचे सदस्य फुटल्यामुळे या सहा सदस्यांना आमिष दाखवून घोडेबाजार केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केला आहे. या सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.

आमचे सदस्य आमिषाला बळी पडल्याने आमचा नाईलाज झाल्याचे केंद्रे म्हणाले. तर या अविश्वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य शिवाजी मुळे यांनी राजकीय कौशल्य वापरून केलेली खेळी यशस्वी ठरली. भाजप सदस्यांना विश्वासात घेण्यात यश आल्याने भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख