औरंगाबाद ः भाजपने मला अठरा वर्षानंतर पहिल्यांदा मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत तिकीट दिले होते. वंसतराव काळे यांच्या विरोधात मी निवडूण आलो होतो. तेव्हा सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले, पण अनेकांची इच्छा नसतांना मी निवडूण आलो. दुसऱ्यांदा पदवीधरची निवडणूक लढलो आणि ३५ पैकी ३३ उमेदवारांचे डिपाझीट जप्त करून २० हजार इतक्या रेकाॅर्डब्रेक मतांनी मी विजयी झालो. अजूनही माझा हा रेकाॅर्ड आबाधित आहे. पण आता सतीश चव्हाण यांच्यासाठी तो मोडणार आणि त्यांना चाळीस हजार मतांनी निवडूण आणणार, असा विश्वास जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केला.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी आपल्या मनोगतामध्ये जयसिंगराव यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांनी देखील जयसिंगराव यांचा काका असा उल्लेख करत त्यांच्याबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या.
यावेळी जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोनवेळा मिळवलेला विजय आणि सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम आपल्या नावावर अजूनही कायम असल्याचे आवर्जून सांगितले. ३५ पैकी ३३ उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त आणि वीस हजारांचे मताधिक्य त्यानंतर कुठल्याच उमेदवाराला गाठता आले नाही.
पण आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी हा विक्रम मोडणार असल्याची ग्वाही गायकवाड यांनी शरद पवार यांच्या समक्षच दिली. मराठवाडा पदवीधरच्या निवडणूकीत सतीश चव्हाण यांना यावेळी ४० हजारांच्या मताधिक्याने नवडूण आणू, असा शब्द गायकवाड यांनी दिला.
मराठावाड मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे मागणी केली होती. उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेत त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच सतीश चव्हाण यांच्या प्रचारात जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतःला झोकून दिले होते.

