मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्तीपणाला लावा.. - Municipal Corporation, Chandrakant Patil reviews the preparation of graduates | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्तीपणाला लावा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

भाजपची थेट लढत महाविकास आघाडीशी असली तरी हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केल्याची माहिती आहे. पदवीधर प्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी देखील सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. शहरातील प्रश्न, विशेषतः रखडलेली पाणी पुरवठा याेजना, रस्त्यांची कामे, कचरा यावर देखील बैठकीत चर्चा झाली.

औरंगाबाद ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघ व आगामी महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. शहर कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. मंडळनिहाय आढावा घेतांना पदवीधरच्या याद्या पाहिल्या का? अशी विचारणा करत त्यांनी जोरदार तयारीला लागा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील कोअर कमिटीची बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. राज्यातील सत्तातंरानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपने जोर लावला आहे. या बैठकीसाठी मराठवाडा पदवीधरसाठी ज्यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ते आमदार संभाजी पाटील निलंगेकर देखील उपस्थित होते. खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्या भाजपचे कोअर कमिटीतील सदस्य बैठकीला हजर होते.

भाजपची थेट लढत महाविकास आघाडीशी असली तरी हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केल्याची माहिती आहे. पदवीधर प्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी देखील सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. शहरातील प्रश्न, विशेषतः रखडलेली पाणी पुरवठा याेजना, रस्त्यांची कामे, कचरा यावर देखील बैठकीत चर्चा झाली.

बोराळकरांना पुन्हा संधी..

मराठवाडा पदवीधरची उमेदवारी कुणाला द्यायची,  यावर देखील बैठकीत चर्चा झाली. भाजपकडून अनेकांनी इच्छा व्यक्त केली असली तर गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिरीष बोराळकर यांनाच पक्षाकडून पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे समजते. आज रात्री त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रवीण घुगे, किशोर शितोळे, जयसिंगराव गायकवाड यांची नावे देखील स्पर्धेत होती. परंतु बोराळकर यांना एक संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाल्यामुळे उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख