मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही... - Munde means BJP will never be erased from my head | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही...

जगदीश पानसरे
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

शिरीष बोराळकर यांना बोलावून घेत मी दोन तास त्यांच्याशी चर्चा केली होती. कोअर कमिटीच्या बैठकीत मी तुमचं नाव घेणार नाही, हे देखील स्पष्ट सांगितले होते. मुंडे साहेबांचे आणि भाजपचे संस्कार असल्यामुळे मी हे सांगितले. कारण मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही. परंतु आता पक्षाने अधिकृत उमेदवारी बोराळकरांना जाहीर केली आहे. तेव्हा त्यांना निवडूण आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावे.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी जेव्हा उमेदवारी देण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा कोअर कमिटीच्या बैठकीत सामजिक संतुलन साधले जावे, अशी भूमिका मी मांडली होती. त्यामुळे शिरीष बोराळकर यांना बोलावून मी कोअर कमिटीच्या बैठकीत तुमचे नाव घेणार नाही हे मी सांगितले होते. परंतु आता पक्षाने जो अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे, त्याला निवडूण आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली. गोपीनाथ मुंडे आणि भाजपने तसे संस्कारच आपल्यावर केले आहेत. मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही, असेही पकंजा यांनी ठणकावून सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी बोलतांना पंकजा मुंडे यांनी भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, हे मी अंहकाराने नाही, तर प्रेमाने बोलते असे सांगत बंडखोरी, नाराजीच्या चर्चा या अफवा असलल्याचे स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आज जर मी आले नसते तर वर्तमान पत्र आणि चॅनेलच्या हेडलाईन झाल्या असत्या. सर्व विमाने बुक असूनही मी इथे आले आहे, यापेक्षा आणखी काय संदेश देऊ. त्यामुळे आता काहीही डोक्यात न ठवेता भाजपकडे असलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी जोमाने कामाला लागा. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील चार मतदारसंघाचे उमेदवार निश्चित करायचे होते. त्यामुळे सहाजिकच आपण काही नावे प्रामाणिकपणे पक्षासमोर ठेवतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो. कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारी देतांना समतोल साधला जावा, अशी भूमिका मी मांडली होती.

त्यामुळे बैठकीआधी शिरीष बोराळकर यांना बोलावून घेत मी दोन तास त्यांच्याशी चर्चा केली होती. कोअर कमिटीच्या बैठकीत मी तुमचं नाव घेणार नाही, हे देखील स्पष्ट सांगितले होते. मुंडे साहेबांचे आणि भाजपचे संस्कार असल्यामुळे मी हे सांगितले. कारण मुंडे म्हणजे भाजप हे माझ्या डोक्यातून कधीच पुसले जाणार नाही. परंतु आता पक्षाने अधिकृत उमेदवारी बोराळकरांना जाहीर केली आहे. तेव्हा त्यांना निवडूण आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावे. व्यासपीठावर बसलेले सगळे कामाला लागले आहेतच, कार्यकर्त्यांनी देखील आता उंटावरून शेळ्या न हाकता कामाला लागावे, असे आवाहन पंकजा मुुंडे यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख