MP Chikhalikar criticised Ashok chavan but behaved like him only | Sarkarnama

कोरोना ट्रिटमेंट : अशोक चव्हाणांवर केलेली टीका खासदार चिखलीकरांच्या अंगलट

अभय कुळकजाईकर
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच का उपचार घेतले नाहीत, अशी विचारणा नांदेडचे खासदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर हे कोरोनाचे रुग्ण झाल्यावर त्यांनीही नांदेडमध्ये उपचार घेण्याचे टाळले. 

नांदेड : कोरोनावरील उपचारासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईला हलविण्यात आले होते. त्यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्यावर नांदेडला उपचार होत नाहीत का, अशी विचारण करत टीका केली होती. त्यानंतर आता खासदार चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.  

नांदेडच्या राजकारणात कॉँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दोघे केंद्रस्थानी असतात. दोघांचे विळ्या भोपळ्याचे वैरही राज्याच्या राजकारणात सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दोघेही तसेच त्यांचे समर्थकही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळातही त्यांनी एकमेकांवर टीका केली होती.

कॉँग्रेसच्या दिग्गजांना झाला कोरोना
कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांच्यासह उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांचे पुत्र आदींना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी मुंबईला उपचार घेतले. त्याचबरोबर आमदार राजूरकर आणि आमदार जवळगावकर यांनी देखील मुंबईत उपचार घेतले तर आमदार हंबर्डे, माजी महापौर सत्तार व त्यांच्या पुत्राने औरंगाबादला उपचार घेतले होते.

चिखलीकर यांनी केली होती टीका
दरम्यान, श्री. चव्हाण यांनी मुंबईला उपचार घेतल्यानंतर त्यांच्यावर भाजपचे खासदार चिखलीकर यांनी एका पत्रकाद्वारे कोरोनातून लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत नांदेडला उपचार का घेतले नाहीत? नांदेडच्या डॉक्टरांवर विश्वास नाही का? असे प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. त्यानंतर त्यावर कॉँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिले होते. त्याचीही जोरदार चर्चा झाली होती.

चिखलीकरांवर औरंगाबादला उपचार
भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. श्री. गोजेगावकर यांनी औरंगाबादला तर साले यांनी नांदेडला उपचार घेतले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव प्रविण पाटील चिखलीकर आणि त्यांच्या चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. सुरवातीला त्यांनी नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले व नंतर औरंगाबादला उपचारासाठी गेले. खासदार चिखलीकर यांच्यासोबतही चालक होता त्यामुळे त्यांनी स्वतःहून औरंगाबादला स्वॅब दिला त्यात ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खासदार चिखलीकर यांच्यावर औरंगाबादला उपचार सुरु करण्यात आले आहेत.

चिखलीकरांच्या अंगलट आली टीका
दरम्यान, खासदार चिखलीकर यांच्यावर औरंगाबादला उपचार सुरु असल्यामुळे त्याची चर्चा नांदेडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली. स्वतः चिखलीकर यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्यावर आरोप केले होते आणि तेच आता नांदेडला उपचार घेण्याऐवजी औरंगाबादला उपचार घेत आहेत. त्यामुळे खासदार चिखलीकर यांनी केलेली टीका त्यांच्याच अंगलट आल्याची चर्चा आता नांदेडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख