कदमांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवले ;उद्धव ठाकरेंचे वजन खैरेंच्या पारड्यात

चंद्रकांत खैरे येत्या काळात जिल्ह्यातील आजी माजी शिवसेना आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकारी यांना एकत्र आणणार का ? दुभंगलेली माने सांधणारी का ? पक्षांतर्गत गटबाजी सामावून सर्वाना एकदिलाने उभे करण्यात आपलेसे करण्यात किती यश मिळवतात हे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाचे ठरणार आहे .
Khaire---Kadam
Khaire---Kadam

औरंगाबाद : औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्षात अखेर खैरेंची सरशी झाली आहे . शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपले निर्णायक वजन चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात टाकल्याने रामदास कदम यांना आता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद  स्वीकारावे लागणार आहे . 

या फेरबदलामुळे चंद्रकांत खैरे यांचे मातोश्रीवरील वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे . यापूर्वीही शिवसेनेत चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते आणि अन्य नेत्यांचा संघर्ष झालेला आहे पण अखेर खैरेंची बाजू वरचढ ठरलेली आहे . 

 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांची उचलबांगडी केली आहे. कदम यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यातील बेबनाव हे या बदलामागील कारण असल्याचे बोलले जाते. 

शिवसेनेच्या शिफारशीवरून मंगळवारी (ता. 17) रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पालकमंत्री बदलावर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे तीन वर्षापासून जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत होते. परंतु सुरुवातीपासूनच त्यांचे जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी खटके उडाले. 

विशेषता त्यांच्या काळात जिल्ह्यातील गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जाते. अंतर्गत वाद रोखून पक्षाला एकत्रित ठेवण्या ऐवजी रामदास कदम यांनी खैरे विरोधकांची मोट बांधून त्यांना बळ देण्याचे धोरण ठेवले.

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, महापालिकेतील माजी सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, मध्यचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह महापालिकेतील काही नगरसेवकांना आणि आजीमाजी आमदारांना रामदास कदम यांनी खैरे यांच्या  विरोधात रसद पुरवल्याचा आरोप केला जातो. 

चंद्रकांत खैरे यांनी केंद्र सरकारकडून शहरासाठी मंजुर करून आणलेल्या समांतर जलवाहिनी योजनेला देखील रामदास कदम यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी चंद्रकांत खैरे प्रयत्नशील असतांना पालकमंत्र्यांनी मात्र  या योजनेवरील अवाजवी खर्चाला आक्षेप घेत   विरोधात भूमिका घेतली आणि  ही योजना शहरासाठी घातक असल्याची जाहीर करून टाकले. पक्षातंर्गत गटबाजीला खतपाणी आणि खैरे यांना विरोध करण्याचे कदम यांचे कायम धोरण राहिले. 

कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वादात देखील रामदास कदम यांनी हर्षवर्धन जाधव यांची बाजू घेतली. एकंदरित रामदास कदम यांनी सातत्याने खैरे विरोधाची भूमिका घेतल्यामुळे या दोघांमधील वाद अनेकदा मातोश्रीवर गेले. 

या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री रामदास कदम यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपले वजन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात टाकत त्यांना झुकते माप दिल्याचे दिसते. रामदास कदम यांची उचलबांगडी करून आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्यावर पालकमंत्री पदाची जबादारी सोपवण्यात आल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन आणखी वाढले आहे.

 मात्र उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्या बाजूने कौल दिल्याने खैरे यांचीही जबाबदारी आता वाढली आहे . औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस एकत्र येऊन आपला प्रभाव वाढवीत असताना या पक्षांच्या वाढत्या जनाधाराला आळा 
घालण्याची जबाबदारी खैरेंवर येऊन पडणार आहे .

त्याचप्रमाणे चंद्रकांत खैरे येत्या काळात जिल्ह्यातील आजी माजी शिवसेना आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि महापालिकेतील  पदाधिकारी यांना एकत्र आणणार का ? दुभंगलेली माने सांधणारी का ? पक्षांतर्गत गटबाजी सामावून सर्वाना एकदिलाने उभे करण्यात आपलेसे करण्यात किती यश मिळवतात हे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाचे  ठरणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com