आमदार गुट्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांना घडवला बैलगाडी प्रवास - MLA Gutte arranged for the District Collector to travel in a bullock cart | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार गुट्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांना घडवला बैलगाडी प्रवास

मारोती नाईकवाडे
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी पालम तालुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी व पालम या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे रावराजूर या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वाहन जात नसल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांनी बैलगाडी मागवून घेतली. या बैलगाडीतून गुट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी केली.

पालम ः गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पालम तालुक्यात शेती, पिकं आणि फळबागांचे नुकसान मोठे आहे. त्यामुळे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे दोन दिवसांपासून तालुक्यात फिरून झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. रविवारी त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांना सोबत घेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी रस्ता नसल्याने आमदार गुट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी मुगळीकरांना देखील बैलगाडीत बसून शेताच्या बांधावर पोहचावे लागले.

गंगाखेड विधानसभा मतदार संघात गेल्या दहा दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा पालम तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरानेही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. यामध्ये कापूस, सोयाबीन व उस या पिकांची मोठी नासाडी झाली आहे.

या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे आग्रही आहेत.  राज्यस्तरावरून पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पालम तालुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी, पालम आदी गावातील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दौरा केला.

या दौऱ्यात त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ज्योती चव्हाण, जिल्हा अध्यक्ष अॅड. संदीप अळनुरे, पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष असदख पठाण, नगरसेवक संजय थिटे, शेख गौस, शिवराम पैके, चंद्रकांत गायकवाड राहुल शिंदे बाळासाहेब फूलपगार, नारायण झिलेवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित हेाते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पालम तालुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी व पालम या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे रावराजूर या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वाहन जात नसल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांनी बैलगाडी मागवून घेतली. या बैलगाडीतून गुट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी केली.

पालम तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शनिवारी तालुक्यातील शेत शिवाराला भेटी दिल्या होत्या. भर पावसात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील अडचण लक्षात घेता शनिवारी रात्रीच त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधून तालुक्याचा दौरा करावा अशी विनंती केली होती. त्यानंतर आज रविवारी परत गुट्टे हे पालमसह गंगाखेड तालुक्यातील काही गावांना भेटी देण्यासाठी पोहचले होते.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख