तुळजापुरातून ९ ऑक्टोबरला ठोक मोर्चाची सुरूवात.. - Mass march starts from Tuljapur on 9th October | Politics Marathi News - Sarkarnama

तुळजापुरातून ९ ऑक्टोबरला ठोक मोर्चाची सुरूवात..

तानाजी जाधवर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सर्व प्रकाराच्या नोकरभरतीला तत्काळ स्थगिती द्यावी. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामधील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, कोपर्डी प्रकरणातील दोषींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे.

उस्मानाबाद ः मराठा समाजाच्यावतीने आता ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून, त्याची सुरवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्याच्या समन्वयकांनी दिली. येत्या नऊ ऑक्टोबरला तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात महाजागर करून ठोक मोर्चाला सुरवात करण्यात येणार आहे, राज्यातील समन्वयक यामध्ये सहभागी असणार आहेत. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती उठविण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात येणार आहे.

युती सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटत आहे. मराठा संघटनांनी यासाठी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून न्यायलयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. समन्वयकांनी सांगितले, की स्थगिती उठविण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाची आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करून मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण द्यावे.

केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण दिले असून, त्याचा लाभ मराठा समाजालाही देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. शासन आदेश काढून मराठा समाजाचा समावेश करण्यासंबंधीची कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध खात्यामध्ये भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे, ही मराठा समाजाच्या आरक्षणानंतर करावी.

त्यापूर्वी सर्व प्रकाराच्या नोकरभरतीला तत्काळ स्थगिती द्यावी. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामधील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, कोपर्डी प्रकरणातील दोषींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख