मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड.. - In Marathwada graduate constituency, due to Mahavikas Aghadi, NCP's burden is heavy | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड..

जगदीश पानसरे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

१९८४ पासून झालेल्या सात (पैकी एक पोटनिवडणूक) निवडणुकांमध्ये दोनवेळा काॅंग्रेसचे वंसत काळे,  भाजपचे जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी तर राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी दोनवेळा विजय मिळवला आहे. आता चव्हाण तिसऱ्यांदा विजय मिळवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चव्हाण यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

औरंगाबाद ः राज्यातील पदवीधर मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या या निवडणूकीत कुठला पक्ष बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा विचार केला तर यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार सतीश चव्हाण यांचे पारडे जड मानले जाते. सतीश चव्हाण हे गेल्या बारा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

काॅंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन्ही पक्षांना पदवीधरांनी संधी दिली आहे. अजून कोणत्याही पक्षाने उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नसली तरी, राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांचेच नाव अंतिम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीने चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे, ती पाहता पक्षाने त्यांच्या नावाला संमती दिल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

कधीकाळी भाजपचे वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ गेल्या दोन टर्मपासून २००८ व २०१४ या सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतला आहे. दोनवेळा अपयश आल्यामुळे यावेळी हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही जोर लावला आहे. गेल्यावेळी पराभूत झालेले शिरीष बोराळकर दुसऱ्यांदा नशीब आजमावू पाहत आहेत. पण त्यांना प्रवीण घुगे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांची मोठी स्पर्धा आहे.

भाजपच्या नेत्यांनी मतदार नाोंदणी व मतदारसंघातील संपर्क वाढवण्यासाठी बोराळकर यांच्यावर नोंदणी प्रमुख तर घुगे यांच्यावर सहायक पदाची जबाबदारी सोपवत त्यांना कामाला लावले. तर दुसरीकडे शितोळे हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यांच्या मराठवाडाभर पसरलेल्या शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून भाजप उमेदवार शिरीश बोराळकर यांच्यावर सहज विजय मिळवला होता.

१९८४ पासून झालेल्या सात (पैकी एक पोटनिवडणूक) निवडणुकांमध्ये दोनवेळा काॅंग्रेसचे वंसत काळे,  भाजपचे जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी तर राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी दोनवेळा विजय मिळवला आहे. आता चव्हाण तिसऱ्यांदा विजय मिळवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चव्हाण यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यांना पक्षातून इतर कुणी प्रतिस्पर्धी नसल्याने आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांशीच त्यांची जवळीक असल्याने त्यांना डावलणे शक्य नाही, अशी चर्चा आहे.

हॅट्रीकची संधी..

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्याने आकाराला आलेली राष्ट्रवादी-शिवसेना-काॅंग्रेसची महाविकास आघाडी सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. भाजपने ताकद लावली असली तरी भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा हा थेट सामना होणार असल्याने राष्ट्रवादीला हॅट्रीकची संधी आहे. २००८ च्या पदवीधर निवडणुकीत राज्य पातळीवर शिवसेना- भाजप या पक्षांमधील मतभेदाचा फटका भाजपला बसला होता. शिवसेनेने ऐनवेळी राजू वैद्य यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे श्रीकांत जोशी यांचा पराभव झाला होता. पंधरा हजाराहून अधिक मते वैद्य यांनी मिळवली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख