माझ्या राजकीय कारकीर्दीत अशा अनेक क्लिप तयार केल्या गेल्या, त्यात सत्यता नाही.. - Many such clips have been made in my political career, there is no truth in them | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या राजकीय कारकीर्दीत अशा अनेक क्लिप तयार केल्या गेल्या, त्यात सत्यता नाही..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

माझ्या बाबतीत असे व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. निवडणुक काळात विरोधकांकडून मला बदनाम करण्याचा असा प्रयत्न केला जातो. गेल्या एकवीस वर्षांपासून मी हा अनुभव घेत आहे. पण अजून निवडणूकीला चार वर्ष बाकी आहेत, तेव्हा विरोधकांनी असे प्रकार करू नयेत. कुणाला तरी दारू पाजायची आणि आमच्या सभा, कार्यक्रमात गोंधळ घालायला पाठवायचे, अशा गोष्टी त्यांनी बंद कराव्यात.

औरंगाबाद ः माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अशा अनेक क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आल्या आहेत. निवडणुकीला अजून चार वर्ष बाकी आहेत, त्यामुळे विरोधकांनी माझ्या सभेत गोंधळ घालण्यासाठी तरुणांना दारू पाजून पाठवणे बंद करावे, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कुठल्याच प्रकारची सत्यता नाही, असे स्पष्टीकरण महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्याबद्दल जर कुणी अपशब्द काढला तर ऐकूण घेणार नाही, असा इशाराही सत्तार यांनी दिला.

मराठा आरक्षणा संदर्भात जाब विचारला म्हणून शिवसेनेचे राज्यमंत्री सत्तार यांनी एका तरूणाला आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील जिवरग-टाकळी गावातील एका तरुणाने सत्तार यांना मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केले असा जाब विचारला असता आक्रमक झालेल्या सत्तारांनी या तरुणाला शिवीगाळ केल्याचा दावा केला जातोय. संबंधित तरुणाने देखील एक व्हिडिओ प्रसारित करत आपले काही बरे वाईट झाले तर त्याला अब्दुल सत्तार हे जबाबदार असतील असे सांगणारा व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केला आहे.

या प्रकारावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता पाहता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले असून या व्हिडिओमध्ये सत्यता नसल्याचा दावा केला आहे. सत्तार म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत गावात गेलो असता माझ्या भाषणावेळी एक तरूण वारंवार अडथळा निर्माण करत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दलही त्याने अपशब्द काढले, ते मी कदापी सहन करणार नाही. या तरूणाचा बोलवता धनी दुसराच कुणी तरी आहे. माझ्या तोंडी जे घालण्यात आले आहे त्यात तथ्य नाही.

माझ्या बाबतीत असे व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. निवडणुक काळात विरोधकांकडून मला बदनाम करण्याचा असा प्रयत्न केला जातो. गेल्या एकवीस वर्षांपासून मी हा अनुभव घेत आहे. पण अजून निवडणूकीला चार वर्ष बाकी आहेत, तेव्हा विरोधकांनी असे प्रकार करू नयेत. कुणाला तरी दारू पाजायची आणि आमच्या सभा, कार्यक्रमात गोंधळ घालायला पाठवायचे, अशा गोष्टी त्यांनी बंद कराव्यात. जर असे प्रकार थांबले नाहीत, तर मी त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशाराही सत्तार यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख