महाविकास आघाडीला लोहा-कंधारमधून मताधिक्य मिळवून देणार.. - Mahavikas Aghadi will get majority of votes from Loha-Kandhar | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीला लोहा-कंधारमधून मताधिक्य मिळवून देणार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

कायद्याची प्रतिष्ठा जपणारी नॅशनल लॉ कॉलेजची इन्स्टिट्यूट औरंगाबादेत साकारत आहे. यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत होतो.  मराठवाड्यातील बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य या लॉ इन्स्टिट्यूटमुळे  उज्वल होणार असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

नांदेड ः पदवीधरांचे प्रत्येक प्रश्न विधानपरिषदेत आक्रमकतेने गेल्या बारा वर्षात सतीश चव्हाण यांनी मांडले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात पदवीधरांना शिक्षण घेतांना ज्या अडचणी येत होत्या, त्या अडचणीबाबत आग्रही भूमिका मांडून त्याची सोडवणूक त्यांनी केली. पदवीधरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यातील रोजगार उपलब्धीसाठी पुन्हा चव्हाण यांना संधी द्या, असे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी  केले .

सतीश चव्हाण यांनी आपल्या नांदेड दौऱ्यात आज लोहा-कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, आशा शिंदे, यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोहा-कंधार मतदारसंघातून चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य मिळून देणार, अशी ग्वाही, शिंदे यांनी चव्हाणांना दिली. शिवसेनेचे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील सतीश चव्हाण यांनी मराठवाड्यातील पदवीधरांसाठी उल्लेखनीय काम गेल्या बारा वर्षात केल्याचा उल्लेख केला.

आगामी काळातही मराठवाड्याच्या सिंचन, शेती तसेच तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांचे हात बळकट करून त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवा, असे आवाहनही कल्याणकर यांनी केले. या शिवाय नांदेड जिल्हा दौऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील कदम, युवासेनेचे जिल्हाधिकारी माधव पावडे यांनी देखील सतीश चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी राज कॉर्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नांदेड येथील  बँकेस भेट, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना, मुप्टा शिक्षक संघटना, नांदेड शाखेच्या सहविचार सभा घेऊन सतीश चव्हाण यांनी शिक्षक, पदवीधर मतदारांशी संवाद साधला. कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने चव्हाण यांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला. यासंबंधीचे पत्र मराठवाडा विभागाचे संस्थापक अध्यक्ष ननावरे तसेच कार्याध्यक्ष संकपाळ यांनी आपल्या समर्थकांसह चव्हाण यांना दिले. 

तरुणांना रोजगार उपल्बध करून देणार..

नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील बेरोजगारीचे मागासलेपण बाजूला सारून तरुणांना आगामी काळात रोजगार उपलब्ध करून देण्यास माझा प्रयत्न असेल. कायद्याची प्रतिष्ठा जपणारी नॅशनल लॉ कॉलेजची इन्स्टिट्यूट औरंगाबादेत साकारत आहे. यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत होतो.  मराठवाड्यातील बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य या लॉ इन्स्टिट्यूटमुळे  उज्वल होणार असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख