भाजपचे  जयसिंगराव गायकवांड करताहेत प्रवचनाच्या माध्यमातून लोकसभेचा प्रचार 

बीडमधून दोनवेळा खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केलेले जयसिंगराव गायकवाड गेल्या तीन-चार वर्षांत राजकारणापासून अलिप्त होते.
jaysingrao-kaka Gayakvad
jaysingrao-kaka Gayakvad

औरंगाबाद :  आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड सध्या गावोगावी प्रवचने आणि भेटीगाठींच्या  माध्यमातून प्रचाराला लागले आहेत . 

कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठका आणि गावागावातील धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत संपर्क वाढवण्यावर गायकवाड यांनी भर दिल्याचे दिसून येते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप जयसिंगराव गायकवाड यांनाच मैदानात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार देणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री डॉ. महेंद्र सिंह यांची औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर महेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहरात तीन ते चार बैठकाही पार पडल्या. औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स कायम असला तरी या बाबतचे काही संकेत मात्र मिळायला सुरूवात झाली आहे.

बीडमधून दोनवेळा खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केलेले जयसिंगराव गायकवाड गेल्या तीन-चार वर्षांत राजकारणापासून अलिप्त होते. पण औरंगाबाद लोकसभा निवडणूकीत भाजपने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह काही स्थानिक नेत्यांनी जयसिंगराव गायकवाड यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. तेव्हापासूनच जयसिंगराव गायकवाड यांच्या राजकारणातील घरवापसीची चर्चा सुरु झाली होती.

पण भाजपच्या थिंक टॅंकने जयसिंगराव गायकवाड यांच्या नावाची आतापासूनच चर्चा होऊ नये याची खबरदारी घेतली. गायकवाड हे भाजपचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत आणि म्हणूनच आम्ही त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो अशी मखलाशी त्यावेळी करण्यात आली होती.

पंरतु त्यानंतर ज्या वेगाने जयसिंगराव गायकवाड भाजपच्या व्यासपीठावर आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये वावरू लागले त्यावरून त्यांना केवळ वाढदिवसाच्याच नाही तर लोकसभेचे उमेदवार म्हणून देखील शुभेच्छा देण्यात आल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह जिल्ह्यात पक्षाच्या वतीने होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात जयसिंगराव गायकवाड यांना मानाचे पान देण्यात आले. लोकसभा उमेदवारीसाठी पक्षातील इतरही बारा जणांची नावे चर्चेत असली तरी उमेदवारीची माळ जयसिंगराव गायकवाड यांच्याच गळ्यात पडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

धार्मिक कार्यक्रमांना हजेरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि दोनवेळा खासदार राहिलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत ग्रामीण भागात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांतील त्यांच्या भरगच्च कार्यक्रमांवर नजर टाकली तर जयसिंगराव गायकवाड यांची ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची पायाभरणीच असल्याचे मानले जाते.

9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान जयसिंगराव यांनी कन्नड, गंगापूर आणि खुल्ताबाद या तीन तालुक्‍यातील धार्मिक कार्यक्रमांना आर्वजून हजेरी लावल्याचे दिसून आले. केवळ हजेरीच नाही तर उपस्थितांना प्रवचन देत त्यांनी त्यांची मने जिंकण्याचाही प्रयत्न केला. दरेगांव, विरमगाव, शेखपुरवाडी, बाजारसांवगी, लामनगांव, येसगांव, शिवरीफाटा, पाडळी आदी गावांना भेटी देत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठका घेतल्या. विरमगांव येथील संगमेश्‍वराचे दर्शन घेत तिथे उपस्थित लोकांना प्रवचनही दिले.

संघ आणि भाजपकडून जयसिंगराव गायकवाड यांच्या औरंगाबाद लोकसभा उमेदवारीला हिरवा कंदील मिळणार असल्याची चर्चा देखील भाजपच्या गोटात आहे. जयसिंगरावांचे अचानक सक्रीय होऊन मतदारसंघात सुरु झालेले दौरे आणि गाठीभेटींचे सत्र पाहता त्यांना तयारीला लागण्याचे आदेश मिळाले आहेत का याबाबत कार्यकर्त्यात चर्चा आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com