राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधातील लढाई लढू आणि जिंकूही.. - Let's fight and win the battle against the government under the leadership of Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधातील लढाई लढू आणि जिंकूही..

जगदीश पानसरे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांना एमएसपी, मार्केट कमिटीच्या माध्यमातून होणारी खरेदी या दोन महत्वाच्या गोष्टी या विधेयकाच्या माध्यमांतून संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून देशातील शेतकऱ्यांची शेती अदाणी, अंबानी सारख्या मोठ्या उद्योजकांच्या ताब्यात देण्याचा हा प्रयत्न आहे.

औरंगाबादः  केंद्रातील मोदी सरकारचा गेल्या सहा वर्षातील कारभार पाहिला तर तो शेतकरी विरोधी असाच होता. आधी भुमीअधिग्रहण कायदा आणण्याचा या सरकारने प्रयत्न केला होता, आता तीन शेतकरी विरोधी कायदे पास करून घेत या सरकारने पुन्हा एकदा आपला शेतकरी विरोध दाखवला आहे. आम्ही राज्यसभेत आणि रस्त्यावर देखील या काळ्या कायद्याच्या विरोधात उतरलो आहोत. भविष्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोदी सरकारच्या विरोधातातील लढाई लढू आणि जिंकू, असा विश्वास काॅंग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केला.

स्पीक अप फाॅर फार्मर मोहिमे अंतर्गत राजीव सातव यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात राज्यसभेत जो प्रखर विरोध झाला त्यात राजीव सातव आघाडीवर होते. संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी उपसभापतींनी त्यांच्यासह सात खासदरांवर निलंबनाची कारवाई देखील केली होती. त्याला संसद परिसरात उपोषण करत सातव व अन्य खासदारांनी उत्तर दिले होते.

या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्पीक अप इंडिया मोहिमत आज शेतकऱ्यांच्या विषय घेऊन त्यावर भाष्य करण्यात आले. सातव म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे अंहकारी आणि शेतकरी विरोधी आहे. भुमीअधिग्रहण आणि आता शेतकऱ्यांची शेती मोठे उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या घशात घालणारे तीन कृषी कायदे या सरकारने प्रचंड विरोध असतांना मंजुर करून घेतले. आम्ही संसदेपासून रस्त्यापर्यंत या विधेयकांचा विरोध केला.

शेतकऱ्यांना एमएसपी, मार्केट कमिटीच्या माध्यमातून होणारी खरेदी या दोन महत्वाच्या गोष्टी या विधेयकाच्या माध्यमांतून संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून देशातील शेतकऱ्यांची शेती अदाणी, अंबानी सारख्या मोठ्या उद्योजकांच्या ताब्यात देण्याचा हा प्रयत्न आहे. या विरोधात आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठी लढाई लढणार आहोत. आम्हाला विश्वास आहे आम्ही ही लढाई निश्चितच जिंकू, असेही राजीव सातव म्हणाले.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख